Maharashtra GovPoliticsराजकारण

करोना संकटात भाजपची आंदोलनं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मागणी

मुंबई: करोनाची लाट पुन्हा येत आहे, अशा परिस्थितीत केंद्राच्या सूचनेनुसार तसेच योग्य त्या सावधतेने आम्ही जनजीवन पूर्वपदावर आणत आहोत मात्र, काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करीत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये केली. महाराष्ट्रात विविध मुद्द्यांवर विरोधी पक्ष भाजप तसेच अन्य पक्षांकडून वारंवार आंदोलने करण्यात येत आहेत. त्याकडेच एकप्रकारे मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आज लक्ष वेधले आहे.

करोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसेच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल. आज दिल्ली, केरळमध्ये संसर्ग वाढला आहे तर उद्या आणखी कुठल्या राज्यात वाढेल. महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी २४ हजार रुग्ण दररोज सापडायचे. तिथे आता ४७०० ते ५००० रुग्ण दररोज आढळत आहेत. रुग्णसंख्या कमी होत असली तरी आम्ही राज्यातील जनतेला गाफील न राहण्याच्या आणि त्रिसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य त्यांना समजावून सांगावे व राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात. आज एकीकडे आम्ही करोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत, त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात व दुसऱ्या करोना लाटेला आमंत्रण मिळू शकते,’ अशी भीती मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली.

कोविडमधून बऱ्या झालेल्या काही रुग्णांमध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या देखील आढळत असून यावरही आपल्याला लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आज राज्यात दररोज ७० ते ८० हजार चाचण्या होत असून आरटीपीसीआर चाचण्या अधिक वाढविण्याचे तसेच संसर्गग्रस्त व्यक्तीचे जास्तीतजास्त संपर्क शोधण्यास सांगण्यात आले आहे. करोना परिस्थिती लक्षात घेऊन आम्ही अतिशय सावधपणे पावले टाकत असून केंद्राने दिलेल्या सूचनांचे वेळोवेळी पालन केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सूचना कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करीत असून राज्यात दोन टप्प्यात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे व संसर्ग रोखण्यात यश मिळाले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. या मोहिमेत प्रत्येक घरात आरोग्य चौकशी करण्यात आली असून ११ कोटी ९२ लाख लोकांचा आरोग्य डेटा आपल्याकडे आहे. यातून राज्याचा आरोग्य नकाशा तयार होण्यास मदत होणार आहे. या मोहिमेत ३.५ लाख सारी आणि आयएलआयचे रुग्णही सापडले तसेच ५१ हजार करोना रुग्ण आढळले ज्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहितीही त्यांनी दिली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button