Railwaysमुंबई

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी मुंबई लोकलची सेवा सुरु

मुंबई : अनलॉक – 1 मध्ये उद्योग, तसेच नोकरदार कर्मचा-यांनाही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत कामावर हजर होण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. मात्र, लोकल रेल्वेला मंजुरी नसल्याने बेस्टमध्ये लोकांची एकच गर्दी उसळली होती. अखेर राज्य सरकारच्या मागणीनुसार मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्माचाऱ्यांसाठी मर्यादित स्वरुपात मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा आजपासून सुरु झाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अप-डाऊन अशा लोकलच्या 346 फेऱ्या असतील.

सर्वसामान्य मुंबईकर प्रवाशांना मात्र या ट्रेनमधून प्रवास करता येणार नाही. ही उपनगरीय सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच असणार आहे.

शासकीय किंवा खाजगी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्याचं ओळखपत्र पाहूनच त्यांना या ट्रेनमधून प्रवासाचं तिकीट मिळेल, तसंच प्रवास करता येईल.

मुंबईत जीवनावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केल्यानंतर काल रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य सरकार यांच्यात महत्वाची बैठक झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पश्चिम रेल्वेची लोकल सेवा

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट-डहाणू रोडवर उपनगरीय सेवा सुरु झाली आहे. या मार्गावर अप 60 आणि डाऊन 60 अशा, 12 डब्यांच्या 120 फेऱ्या चालवल्या चाणार आहेत. दर 15 मिनिटांच्या अंतराने धावणाऱ्या या बहुतांश उपनगरीय फेऱ्या विरार आणि बोरिवलीपर्यंत असतील तर उर्वरित डहाणू रोडपर्यंत जातील. पहाटे 5.30 पासून रात्री 11.30 पर्यंत लोकल धावतील.

रेल्वेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, 65 ट्रेन चर्चगेट ते विरार आणि 8 ट्रेन विरार ते डहाणू रोड मार्गावर धावतील. या ट्रेन चर्चगेट ते बोरिवली मार्गावर फास्ट असतील तर त्यापुढे स्लो होतील.

या गाड्य़ा सकाळी 5-30 ते रात्री 11-30 पर्यंत पंधरा मिनिटांच्या अंतराने धावतील.

मध्य रेल्वेची लोकल सेवा

सेंट्रल रेल्वे अप-डाऊन मार्गावर प्रत्येकी 100 अशा 200 ट्रेन चालवणार आहे. सेंट्रल रेल्वेवरील ट्रेनही वेस्टर्नप्रमाणेच फास्ट ट्रेनच्याच थांब्यांवर थांबतील. या ट्रेन आधी सुरु असलेल्या रेल्वे कर्मचारी स्पेशल ट्रेन वगळून आहेत.

मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून कसारा, कर्जत, कल्याण आणि ठाणे या मेनलाईनवर 130 उपनगरीय सेवा धावतील तर उर्वरित 70 सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल या हार्बर मार्गावर धावतील.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार या गाड्यांमध्ये सामान्य मुंबईकरांना प्रवेश नसेल. फक्त सरकारी कर्मचा-यांसाठी ही लोकलची सेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांना ओळखपत्राशिवाय स्टेशनच्या आत प्रवेश मिळणार नाही. स्टेशनजवळ पार्किंगची सुविधा मिळणार नाही तसंच फेरीवाल्यांनाही परवानगी नसेल. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणताही प्रवासी ट्रेनमध्ये उपस्थित नसेल. ही खात्री करून घेण्यासाठी रेल्वे आणि राज्य सरकारच्या अधिकारी, चेकींगसाठी असतील.

ट्रेनमध्ये सोशल डिस्टन्सिंग गरजेचं

प्रत्येक ट्रेनची क्षमता 1200 प्रवाशांची असते, पण सोशल डिस्टन्सिंगचं पालन व्हावं यासाठी एका ट्रेनमध्ये केवळ 700 प्रवाशांनाच परवानगी दिली जाईल. सोबतच संपूर्ण प्रवासादरम्यान प्रवाशांना मास्क लावावा आणि हात सॅनिटाईज करावेत, असं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button