मुंबई: रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केलं आहे. रायगड पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली. पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे.
यावरून आता निरनिराळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत असून भाजपा आमदार आशिष शेलार यांनीदेखील या प्रकरणावरून ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातल्या प्रेससाठी काळा दिवस असल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या असहिष्णुतेचा खरा चेहरा जगासमोर. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणारे आता शांत आहेत, प्रेस, सामान्य माणूस आणि नागरिक त्रस्त आहेत, असंही टीकास्त्रही त्यांनी ठाकरे सरकारवर सोडले आहे.
एका प्रकरणात राज्य सरकारला उघडे पाडले म्हणून पत्रकार राहुल कुलकर्णीला अटक केली… सरकारविरोधात सोशल मिडियावर बोलणाऱ्या निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांसह सामान्य माणसाला ठेचून काढणे नित्याचेच झाले… आता सरकारला खडा सवाल विचारणाऱ्या संपादकाच्या हातात बेड्या… वा रे वा लोकशाही सरकार! काँग्रेसच्या सहवासात बिघडले ठाकरे सरकार.. हाच का तुमचा लोकशाही कारभार? दुर्दैवाने, लोकशाहीचा आजचा काळा दिवस… महाराष्ट्र आणिबाणीच्या दिशेने? अशा शब्दात आशिष शेलारांनी हल्लाबोल केला .


