‘त्या’ फाईलला पुणे ते मुंबई या प्रवासाला तीन महिने का लागतात? भाजप नेत्याचा ठाकरे सरकारला सवाल
मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम व्यवसायाला पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य सरकारने मुद्रांक शुल्क कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर भाजपने रेडीरेकनरच्या दराचा प्रश्न उपस्थित केला असून, तीन महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेली फाईल पुण्याहून मुंबईला पोहचण्यासाठी तीन महिने लागतात का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारकडे केला आहे.
“निधीसाठी रोज केंद्र सरकारच्या नावाने ओरडणाऱ्यांनी राज्याच्या तिजोरीत जमा होणारा महसूल कमी करीत, मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. चला चांगले आहे! पण… रेडीरेकनरच्या दरांचे काय? ते का घोषित करत नाही?” असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. “रेडीरेकनरचे दर मार्चमध्ये कोरोनामुळे जाहीर झाले नाहीत. मेपर्यंत मुदतवाढ दिली. राज्याचे मुद्रांक महानिरीक्षक, पुणे यांच्याकडे मेमध्ये ही फाईल तयार झाली.
पुण्याहून निघालेली रेडी रेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून "टोल" गोळा करीत तर मुंबईत येत नाही ना?
तिघाडीच्या भांडणात अडकली नाही ना?
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी “पदयात्रा” करुन "लक्ष्मीदर्शन" तर करीत नाही ना?
फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकलेय? (3/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 27, 2020
पण, ती ऑगस्ट संपला तरी मंत्रालयापर्यंत का पोहचलीच नाही? पुणे ते मुंबई या प्रवासाला तीन महिने का लागतात?” असेही शेलार म्हणाले. पुण्याहून निघालेली रेडीरेकनरची फाईल बिल्डरांच्या कार्यालयातून ‘टोल’ गोळा करीत तर मुंबईत येत नाही ना? तिघाडीच्या भांडणात अडकली नाही ना? मुंबई-पुणे एक्सप्रेस वे असताना ही फाईल सत्ताधाऱ्यांसाठी ‘पदयात्रा’ करून ‘लक्ष्मीदर्शन’ तर करीत नाही ना? फाईल संशयाच्या बोगद्यात का अडकलेय?” अशी शंकाही शेलार यांनी उपस्थित केली आहे.


