मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दरम्यान, राज्यातील परिस्थितीवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील चर्चेदरम्यान आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. “महाराष्ट्रात मुंबई पुणे महत्त्वाचं आहे. नाशिक औरंगाबाद, नागपूरही महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे?,” असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
“मुख्यमंत्र्यांनी मुंबई पाहायचं, उपमुख्यमंत्र्यांनी पुणे पाहायचं मग बाकी जिल्ह्यांना कोण वाली आहे? इतर ठिकाणं याच राज्यात आहेत. यांचा कोण वाली आहे? कोणता नवा पैसा सरकारनं या ठिकाणी दिला? त्या ठिकाणी राहणारे लोकदेखील आपलेच आहेत ना. त्यांच्याकडेही लक्ष द्यावं. तिथे जाणं शक्य नसेल तर इथून आढावा घ्यावा. मुंबई पुण्याइतकंच मर्यादित तुमचं राज्य आहे का?,” असा सवालही फडणवीसांनी यावेळी केला.
“कोरोनाच्या लढाईत ऑस्किजन बेडची कमतरता आहे. मेडिकल ऑस्किजन आता कोणीही तयार करू शकतं. पण काळाबाजार थांबवायला हवा. ऑक्सिजन अभावी लोकांचा मृत्यू होतोय. कोविडच्या लढाईतलं गांभीर्य सरकारला नाही. विरोधी पक्ष म्हणून आम्ही मदतीला तयार आहोत. ही फक्त सत्तारुढ पक्षाची लढाई नाही. पण निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. परंतु त्याचं गांभीर्य दिसत नाही. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेतलं नाही तर येत्या काळात रोज २ हजार लोकांना जरी रुग्णालयात न्यावं लागलं तरी तेवढी व्यवस्था उरणार नाही. आरटीपीसीआरच्या टेस्ट, आयसोलेशनच्या व्यवस्था राज्यात वाढवल्या पाहिजेत,” असेही त्यांनी नमूद केले आहे.


