जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण होवून बळीराजाचे कल्याण व्हावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विठ्ठल चरणी साकडे
सालाबादप्रमाणे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री सपत्नीक मध्यरात्री २ वाजून १० मिनिटांनी विठ्ठल मंदिरात दाखल झाले. त्यानंतर २ वाजून २५ मिनिटांनी पूजेला सुरुवात झाली. परंपरेप्रमाणे दरवर्षी मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान एका वारकरी दाम्पत्याला मिळत असतो. हा मान यंदा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातल्या सांगवी सुनेवाडी तांडा गावातील वारकरी दाम्पत्य विठ्ठल चव्हाण आणि प्रयाग चव्हाण यांना मिळाला.
महापूजेनंतर येथे मुख्यमंत्र्यांचा त्यांचा मंदिर समिती आणि मराठा समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी मला या ठिकाणी येता आलं नाही तरी याची मला खंत नाही. कारण विठ्ठलाचा तसा आदेशच होता की, मी केवळ पंढरपूरात नाही तर तुमच्या मनात आहे त्यामुळे तुम्ही जिथे माझी पूजा कराल तिथे मी आहे. मात्र, त्यामुळे माझ्या वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची पूजा करण्याची संधी मला मिळाली.
राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण व्हाव्यात तसेच बळीराजाचे कल्याण व्हावे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्यात पर्जन्यमान चांगले व्हावे, असे साकडे मुख्यमंत्र्यांनी विठ्ठला चरणी घातले.
जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षा पूर्ण व्हाव्यात.
बळीराजा आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे आणि पर्जन्यमान चांगले व्हावे, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना! #विठ्ठल #Vitthal pic.twitter.com/vewtpfeSay— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 11, 2019

