बेस्टचा मुंबईकरांना दिलासा
मुंबई – बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटातुन बाहेर काढण्यासाठी ६०० कोटी रुपयांचे अनुदान देण्याचा प्रस्ताव महापालिकेत पास झाला असून बेस्टने मुंबईकरांसाठी भाडे कपात करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता पाच किलोमीटर अंतरासाठी किमान पाच रुपये इतके भाडे निश्चित करण्यात आले. याआधी कमी अंतरासाठी आठ रूपये मोजावे लागत असत. आज बेस्टच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच बेस्टने सामान्य बसेस व्यतिरिक्त एसी बसेसच्या भाड्यातही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. एसी बसेसच्या भाडे दरात कपात करून ते 6 रूपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. ‘बेस्टचे भाडे कमी केल्याबद्दल आम्ही बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर यांचे आभार मानतो. सध्या कसे ‘बेस्ट’ काम करायचे यावर आम्ही लक्ष देत आहोत. आज केवळ ‘बेस्ट’ ऑफ लक म्हणालयलाच या ठिकाणी आलो’ असे आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव आणि बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर उपस्थित होते.

