महाराष्ट्रात मान्सूनची सुरुवात
अनुकूल हवामानामुळे नैऋत्य मोसमी पावसाने मराठवाड्याचा बहुतांश भागात व विदर्भात हजेरी लावली आहे. रविवारी कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह नाशिक, अहमदनगर व औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागात तसेच विदर्भात चांगला पाऊस झाला. कोल्हापूरला सायंकाळी तासभर पावसाने झोडपून काढले. तसेच सांगली जिल्ह्यासह सातारा शहराच्या बहुतांश भागात देखील पाऊस झाला. अहमदनगर जिल्ह्यात ब्राह्मणगावात शनिवारी रात्री अतिवृष्टी होऊन अडीच तासांत १२५ मिलिमीटर पाऊस झाला. धारणगाव, कोपरगाव येथे घरांमध्ये पाणी शिरले होते. विदर्भात भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यात पावसाने आगमन केले. वादळी पावसाने अमरावती जिल्ह्यात १०५ घरांचे नुकसान झाले. अनेक राज्यांच्या दिशेने मान्सून आगेकूच करत असतानाच, दुसरीकडे मुंबई मात्र कोरडीच आहे. मान्सून मुंबईत दाखल होण्यास मंगळवार उजाडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.