प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी कक्ष सुरु करणार – गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील
राज्यात अंमली पदार्थाची विक्री कुरिअर व पोस्टामार्फत होत असल्यासंदर्भात अजित पवार यांनी लक्षवेधी विधानसभेत मांडली. त्यास उत्तर देताना गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी राज्यात अंमली पदार्थांच्या चोरट्या व्यापारास आळा घालण्याकरीता मुंबई शहरात स्वतंत्र अंमली पदार्थविरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक कक्ष स्थापन करण्यात येईल. मुंबईतील युनिटची संख्या वाढविण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ते मनुष्यबळ आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल. संबंधित कायद्यात सुधारणा करून त्याची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती दिली. मंगळवेढ्यात इतर राज्यातून येणाऱ्या अंमली पदार्थासंदर्भात चेक नाक्यावरील सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्यात येईल आणि जे पोलीस अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मुंबईतील मानखुर्द व शिवाजीनगर येथील अल्पवयीन बालकांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येईल, असे डॉ.पाटील यांनी म्हंटले.