Maharashtra GovRailwaysTravelठाणेसोशल मीडिया

कोपरी पुलाचा पहिला टप्पा ५ महिन्यांत पूर्ण करा – एकनाथ शिंदे

ठाण्यातील कोपरी पुलाच्या पहिल्या टप्प्याचे काम मे, २०२० पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे आदेश राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रेल्वे आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना दिले.

त्यासाठी मनुष्यबळ आणि कामाचा वेग वाढवा, रात्रंदिवस युद्धपातळीवर काम करा, या कामामुळे होणारी वाहतूककोंडी कमी करण्यासाठी पर्यायी रस्त्यांची रूंदी वाढवा, मुंबई महापालिकेच्या बंद जकात नाक्याच्या जागेतून पर्यायी मार्गिका सुरू करा आणि शक्य असेल तिथे मुख्य रस्त्यांवरील दुभाजक हटवून रस्याची रूंदी वाढवा, अशा उपाययोजनाही शिंदे यांनी यावेळी सुचविल्या.

कोपरी पुलाच्या रूंदीकरणाच्या कामामुळे पूर्व द्रूतगती महामार्गावर ठाण्याच्या प्रवेशद्वारापाशीच मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होते. त्याची गंभीर दखल घेत राज्याचे शिंदे यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात सर्व संबंधित विभागांची बैठक बोलावली होती. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंते विनय सुर्वे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आदी अधिकारी उपस्थित होते.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या कोपरी पुलाच्या पायलिंगचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाच्या स्टील गर्डरचे काम पालघर येथे सुरू आहे. फेब्रुवारी महिनाअखेर पायलिंगचे काम पूर्ण होईल. त्यानंतर पुढील अडीच महिन्यांत गर्डर्सचे काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर अस्तित्त्वातल्या जुन्या पुलाच्या दोन्ही बाजूंना नव्याने उभारल्या जाणाऱ्या या पुलांवरून वाहतूक सुरू करणे शक्य होणार आहे. त्यानंतर जुना पूल पाडून त्याठिकाणी मे, २०२१ अखेरपर्यत नव्या पुलाची उभारणी केली जाईल. त्यानंतर या मार्गावरून आठ पदरी वाहतूक सुरू होईल, अशी माहिती या बैठकीत देण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button