डीजीपी नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील; जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र
मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणावर न्यायालयाच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले .
न्यायालयाच्या निकालानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे सध्या चर्चेत आहे. महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांविरुद्ध आरोप करणाऱ्या पांडे यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर रिया चक्रवर्तीवर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओचा हवाला देत निशाणा साधला आहे.
आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्याचबरोबर “नितीशकुमार पुन्हा मुख्यमंत्री म्हणून परत आले, तर हे पोलीस महासंचालक नक्कीच बिहारचे गृहमंत्री असतील,” अशी टीका आव्हाड यांनी पांडे यांच्यावर केली आहे.
Just in case Nitish Kumar returns as CM, this DGP of Bihar will certainly be the Home Minister of #Biharhttps://t.co/7hAqYl4GKs
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) August 20, 2020
दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी महाराष्ट्र सरकारवर टीकास्त्र सोडले . त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीसंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलाताना मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर भाष्य करण्याची तिची लायकी नाही असं म्हटलं होतं. त्यावरून पांडे यांच्यावर टीका होत असून, जितेंद्र आव्हाड यांनीही त्यांच्यावर हल्लाबोल केला .


