अमरावतीमधील लॉकडाऊन आणखी ७ दिवसांनी वाढला!
अमरावती: अमरावती जिल्ह्यात लॉकडाऊन आणखी ७ दिवसांनी वाढवण्यात आला आहे. लॉकडाऊन असूनही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली नसल्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. २२ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत लॉकडाऊनचा पहिला टप्पा होता. परंतु हा टप्पा पूर्ण होण्या आधीच लॉकडाऊन आणखी ७ दिवस वाढवण्यात आला आहे.
अमरावतीत लॉकडाऊन असून सुद्धा कोरोनाचा प्रकोप काही थांबला नाही. लॉकडाऊन काळात ५ दिवसात तब्बल ४०६१ कोरोना रुग्ण आढळले तर ३२ रुग्ण उपचारादरम्यान मरण पावले. त्यामुळे आता अमरावती,अचलपूर, आणि अंजनगाव सुर्जी या तीनही शहरांमध्ये ८ मार्च सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे.
दरम्यान, लॉकडाऊन असून सुद्धा अमरावतीत इतके रुग्ण सापडलेच कसे हा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचं अमरावतीकर पालन करत नाहीत का? कि जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यात कमी पडतेय? असे प्रश्न विचारले जात आहेत. त्यात विनाकारण फिरणाऱ्या लोकांची संख्या काही कमी नाही. पोलिसांनी अनेकांवर कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला तर काहींवर गुन्हे सुद्धा दाखल केले. तरीही विनाकारण आणि किरकोळ कामासाठी फिरणारऱ्यांची संख्या काही कमी झालेली नाही.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. त्यानंतरही लॉकडाऊन वाढू नये असे वाटत असेल तर नियमांचा पालन करा आणि लॉकडाऊन टाळा, असं आवाहन प्राशासनाकाडून करण्यात येत आहे.