Maharashtra Govमुंबई

महाराष्ट्राकडेही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता : शरद पवार

मुंबई : देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब या तीन राज्यांचे अनन्य साधारण महत्त्व आहे . या तिन्ही राज्यांनी त्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे . या तीनही राज्यांकडे आजही देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.सरहद संस्थेने आयोजित केलेल्या ‘महाराष्ट्र-बंगाल मैत्री पर्वा’चे औपचारिक उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ते बोलत होते. ‘लाल-बाल-पाल या तिघांचे भारत देशाच्या जडणघडणीत खूप मोठे योगदान आहे. लाल-बाल-पाल या तिघांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला नवा आयाम दिला. इतकेच नाही तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना आदी विषयांवर भाष्य करत पवार यांनी देशातील माणसांना माणूस म्हणून जोडण्याच्या चळवळीची आज गरज असून देशाला आता नव्या वैचारिक केंद्राची गरज असल्याचेही पवार यांनी आवर्जून नमूद केले. काँग्रेसची स्थापना होण्याच्या वेळी देशात प्लेगची साथ आली होती. त्यामुळं पुण्याला होणारं अधिवेशन मुंबईला घ्यावं लागलं होतं. तशीच परिस्थिती आजही आहे. पुण्याला होऊ घातलेला हा कार्यक्रम आज मुंबईत होतो आहे.

खरं तर माणसांना माणसांपासून दूर ठेवणारा सध्याचा सोशल डिस्टन्सिंगचा काळ आहे. या काळात दोन राज्यांना जवळ आणण्याच्या उपक्रमाची सुरुवात होतेय, हे महत्त्वाचे आहे. सरहदने हाती घेतलेला हा उपक्रम म्हणजे विचारांना कृतीने जोडणारी चळवळ आहे. संत नामदेवांनी सुरू केलेल्या वैचारिक देवाण-घेवाणीची परंपरा आहे. ही परंपरा पुढंही सुरू राहिली. रवींद्रनाथांचे मोठे बंधू सत्येंद्रनाथ टागोर हे महाराष्ट्रात आयपीएस अधिकारी होते. त्यांनी संत तुकारामांचे अभंग बंगाली भाषेत नेले. तसंच गीतारहस्यही बंगालीत नेले .

सुभाषबाबूंचे तर प्रेरणास्थान शिवाजी महाराज होते. महाराष्ट्रातल्या साहित्यिकांवरही रवींद्रनाथांचा खूप प्रभाव होता. या देवाणघेवाणीच्या ऐतिहासिक पर्वाला या निमित्ताने उजाळा मिळणार आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे. बंगालला साहित्य, चित्रपट, संगीत या क्षेत्राचा समृद्ध वारसा आहे.

महाराष्ट्रानेही या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे. या उपक्रमामुळे होणाऱ्या या आदान-प्रदानाच्या प्रक्रियेत सर्वांनी सहभागी झालं पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले. दरम्यान मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमात चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा, डॉ. अमोल देवळेकर, संयोजक युवराज शहा, विकास सोनताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button