Maharashtra Govमुंबई

भविष्यात नेपाळ सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरेल शिवसेनाचा संघपरिवारावर निशाणा

प्रभू श्रीरामांची सासुरवाडी व सीतामाईचे माहेर नेपाळ आहे. मात्र याच नेपाळातून चिन्यांनी हिंदुत्ववाद खतम केला आहे. त्यामुळे भविष्यात नेपाळ ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरेल हे स्पष्ट असल्याचे शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखातून म्हटले आहे. तसेच, संघपरीवारावरही शिवसेनेने निशाणा साधला आहे. नेपाळी जनतेला आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. नेपाळच्या जनतेला आत्मनिर्भर करून आत्मबळ देण्याची गरज आहे. संघ परिवारासमोर हे मोठे आव्हान आहे! संघ परिवार नेपाळवर काय भूमिका घेतो ते पाहायचे असे सामनातून म्हटले आहे.

आजचा सामना –

नेपाळचे विद्यमान राज्यकर्ते हे चीनचे मांडलिक बनत असले आणि त्यातून नेपाळच्या अंगात आले असले तरी नेपाळची जनता हिंदुस्थानबरोबर एक आस्था ठेवून आहे. चीनने भगव्या नेपाळचा रंग लाल केला हे त्यांना मान्य नाही. एक दिवस नेपाळची जनताच बंड करून काठमांडूवर पुन्हा हिंदुत्वाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. त्या नेपाळी जनतेला आत्मविश्वास देणे गरजेचे आहे.

नेपाळच्या जनतेला आत्मनिर्भर करून आत्मबळ देण्याची गरज आहे. संघ परिवारासमोर हे मोठे आव्हान आहे! संघ परिवार नेपाळवर काय भूमिका घेतो ते पाहायचे!

नेपाळच्या सीमेवरून हिंदुस्थानवर गोळीबार केला गेला. हे आता अतिच झाले. रवांडा देशाच्या राष्ट्रप्रमुखाने वॉशिंग्टन किंवा मॉस्कोमध्ये घुसून प्रे. ट्रम्प किंवा पुतिन यांच्या कानफटात मारण्यासारखेच हे आहे. गोळीबार करणारे नेपाळचे पोलीस दल होते. त्यात बिहारमधील एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला. चार जण जखमी झाले. हे लक्षण काही चांगले नाही.

चीन, पाकिस्तान सीमेवर सतत चकमकी सुरू असतात. त्यात आपली सैन्यहानी आणि मनुष्यहानी होत असते. आपले सैनिकही अशा दुश्मनास त्याच जोरदार पद्धतीने प्रत्युत्तर देत असतात, पण आता नेपाळही आमच्यावर गुरगुरू लागला असेल तर हे काहीतरी आक्रीतच म्हणावे लागेल. लडाखच्या सीमेवर चीनने सैन्य आणून ठेवलेच आहे. पाकिस्तानची घुसखोरी व हल्ले थांबलेले नाहीत. अजय पंडित या कश्मिरी पंडिताची दोनेक दिवसांपूर्वी अनंतनाग येथे अतिरेक्यांनी हत्या केली. अजय पंडित हे अनंतनागमधील लुकबावन गावचे सरपंच होते. 370 कलम काढल्यावरही कश्मिरी पंडित घरवापसी करू शकले नाहीत व जे पंडित तेथे हिमतीने राहत आहेत त्यांनाही अशाप्रकारे ठार मारले जात आहे. या घटनेवर ना संघ परिवाराचे भाष्य आले ना भाजपकडून काही टिकाटिप्पणी झाली.

एकंदरीत देशाच्या सीमांवर आजही गोंधळाचेच वातावरण दिसत आहे. सर्वच सीमांवर तणाव आहे. त्यात आता नेपाळची भर पडावी याचे दु:ख आहे. नेपाळने त्यांच्या नकाशात हिंदुस्थानचा काही भूभाग दाखवला आहे. या नकाशाला नेपाळच्या सरकारने मान्यता दिली व नेपाळचे राज्यकर्ते काही ऐकण्याच्या मन:स्थितीत दिसत नाहीत.

हे आम्ही यासाठी सांगत आहोत की नेपाळच्या नव्या नकाशासंदर्भात जे घटनात्मक दुरुस्ती विधेयक होते त्यास नेपाळच्या संसदेने एकमताने मंजुरी दिली आहे. त्यामुळे चर्चेचे दरवाजे बंद झाले असे दिसते. नेपाळच्या नव्या नकाशात कालापानी, लिम्पियाधुरा आणि लिपूलेख हे प्रदेश हिंदुस्थानचे नसून आमचे आहेत असे नेपाळने बजावले आहे. इतके होऊनही आपले पंतप्रधान, संरक्षणमंत्री नेपाळसंदर्भात काही बोलायला तयार नाहीत व नेपाळबरोबरचे संबंध उत्तम असल्याचे आपले लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे सांगत आहेत. नेपाळबरोबर आपला सीमावाद पूर्वीपासून होता, पण तो असा टोकाला गेला नव्हता. नेपाळ कधी हिंदुस्थानवर गुरगुरण्याच्या भानगडीत पडला नव्हता. मात्र आता डरकाळ्या फोडत आहे. त्याची कारणे काय?

नेपाळच्या अंगात हे हत्तीचे बळ आले कोठून? मुळात हे हत्तीचे बळ नसून नेपाळी राज्यकत्र्यांच्या अंगात चिनी ड्रॅगन संचारला असल्याचे लक्षण आहे. लष्करप्रमुख जनरल नरवणे सांगतात, ‘‘नेपाळ सोबतचे आमचे भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि धार्मिक संबंध आहेत. दोन्ही देशांतील संबंध उत्तम आहेत. दोन्ही देशांच्या लोकांना एकत्र जोडण्यासाठी आमच्याकडे चांगल्या व्यक्ती आहेत. आमचे संबंध कायम उत्तम होते आणि भविष्यातही राहतील.’’ लष्करप्रमुखांचे हे बोलणे योग्यच आहे. संबंध उत्तम होते हा भूतकाळ झाला. मात्र वर्तमानात नेपाळ हा आपला मित्र राहिलेला नसून चीनचा मांडलिक म्हणून त्याने भविष्यात वावरायचे ठरवले आहे. हे नजरअंदाज करता येणार नाही. चीन नेपाळला खंडणी देतो. त्या बदल्यात नेपाळ हिंदुस्थानवर गुरगुरत आहे. हिंदुस्थानची डोकेदुखी वाढविण्याचा हा प्रयत्न चीन करीत आहे.

नेपाळ व हिंदुस्थानचे धार्मिक तसेच ऐतिहासिक संबंध आहेत, पण हे संबंध मानणारी पिढी नेपाळमध्ये शिल्लक नाही व चीन हाच त्यांना आपला मायबाप वाटतो. प्रभू श्रीरामांची सासुरवाडी व सीतामाईचे माहेर नेपाळ, असे हे धार्मिक नाते आहे. मात्र याच नेपाळातून चिन्यांनी हिंदुत्ववाद खतम केला आहे. त्यामुळे भविष्यात नेपाळ ही सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरेल हे स्पष्ट आहे. सीमेवर नेपाळी आर्मड पोलीस फोर्सने केलेला गोळीबार त्याच डोकेदुखीची सुरुवात आहे. नेपाळचे लाखो लोक हिंदुस्थानात कामधंदा करीत आहेत. त्याबद्दल कुणी तक्रार केलेली नाही. हिंदुस्थानच्या सैन्य दलात गोरखा रेजिमेंट आहे व त्या गोरखा रेजिमेंटचा अभिमान सगळ्यांना आहे.

हिंदुस्थानच्या प्रमुख ठिकाणची चौकीदारी आजही नेपाळचे गुरखेच करतात व त्यांच्या निष्ठेवर कधीच कोणी संशय घेतलेला नाही. मुंबईसारख्या शहरात नेपाळी तरुण खान-पानाच्या चायनीज गाड्या चालवतात व त्यावर कोणी आक्षेप घेत नाही. इतके हे संबंध मधुर आहेत. आता नेपाळच्या राज्यकत्र्यांनी आडमुठी भूमिका घेतल्याने या नेपाळी चायनीज गाड्यांचा धंदा बंद करा, असे काही लोकांनी बोलायला सुरुवात केली आहे, पण हे सर्वस्वी चूक आहे. नेपाळचे विद्यमान राज्यकर्ते हे चीनचे मांडलिक बनत असले आणि त्यातून नेपाळच्या अंगात आले असले तरी नेपाळची जनता हिंदुस्थानबरोबर एक आस्था ठेवून आहे. चीनने भगव्या नेपाळचा रंग लाल केला हे त्यांना मान्य नाही. एक दिवस नेपाळची जनताच बंड करून काठमांडूवर पुन्हा हिंदुत्वाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. त्या नेपाळी जनतेला आत्मविश्वास देणे गरजेचे आहे. नेपाळच्या जनतेला आत्मनिर्भर करून आत्मबळ देण्याची गरज आहे. संघ परिवारासमोर हे मोठे आव्हान आहे! संघ परिवार नेपाळवर काय भूमिका घेतो ते पाहायचे!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button