‘आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांची कामं करा’; फडणवीसांचा आघाडीला टोमणा
मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी परत एकदा महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षातील नेत्यांवर टोमणा मारला. महा जॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत टाकलेल्या नेत्यांच्या फोटोवरून काँग्रेसनं शिवसेना-राष्ट्रवादीवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून फडणवीस यांनी चिमटा काढला असून, “आपापसात मारामाऱ्या करा, पण लोकांच्या हिताचे निर्णय घ्या,” असा टोमणा फडणवीस यांनी मारला.
देवेंद्र फडणवीस यांनी साखर उद्योगासंदर्भातील प्रश्नांसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती दिली. त्याचबरोबर राज्यातील राजकीय घडामोडींवरही भाष्य केलं. शरद पवारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना फडणवीस म्हणाले, “शरद पवार काय करताहेत म्हणून आम्ही करायचं वगैरे अशी स्पर्धा नाही, केंद्रात आमचं सरकार आहे, त्यामुळे ज्या आवश्यक मागण्या आहेत त्या घेऊन आलो आहोत. आम्ही आमचं काम करतोय. तसेच आम्ही काय केलं म्हणून त्यांनी काय करायचं. आम्हाला असं वाटतं की, सध्या साखर उद्योगाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आमच्या पक्षातील साखर उद्योगात असलेल्या नेत्यांनीही याचं गांभिर्य आमच्या लक्षात आणून दिलं आहे. केंद्रात आमचं सरकार आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडे आम्ही मागणी घेऊन जाणं, हे अपेक्षितच आहे म्हणून आम्ही आलो आहोत,” असं फडणवीस म्हणाले.
अमित शाहांसोबत झालेली भेट ही कुठलीही राजकीय भेट नाही, आम्हाला सरकार पाडणे वगैरेमध्ये रस नाही, शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे, यासाठी ही भेट झाली. पंतप्रधान मोदींची वेळ मिळाली तर त्यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील कोरोना स्थितीची माहिती देईन, काय करता येऊ शकतं याची माहिती देईन. अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत, त्यांचे महाराष्ट्रातील कोरोनास्थितीवर लक्ष आहे, असं फडणवीस यांनी सांगतिलं.
यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना एफआरपी आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांची भेट घेतली, सकारात्मक चर्चा झाली. ऊस आणि साखर कारखान्यांबाबत कृषी मंत्र्यांचीही भेट घेणार आहोत, केंद्र सरकारकडून साखर उद्योगासाठी योग्य मदत होईल. कर्जाचं पुनर्गठण, साखर कारखान्यांना मदत, सॉफ्ट लोन, साखर भाव पडणार नाही यासाठी सकारात्मक चर्चा झाली, किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली आहे, असं फडणवीस म्हणाले.
महा जॉब्स पोर्टल संदर्भातील जाहिरातीवरून काँग्रेसनं नाराजी जाहीर केली होती. त्याविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नांवर बोलताना फडणवीस म्हणाले,”आमचं म्हणणं एवढंच आहे की, फोटो कुणाचेही छापा. पण, तुम्ही ज्या मोठंमोठ्या घोषणा केल्या आहेत. इतक्या लोकांना रोजगार देऊ, इतक्या लोकांना नोकऱ्या मिळेल. इतक्या कंपन्या येतील. त्यासंदर्भात काहीतरी कार्यवाही करा. बाकीजाहिरातींवर कुणाचेही फोटो छापा, मारामाऱ्या करा, पण लोकांना फायदा झाला पाहिजे असे निर्णय घ्या,” असा टोमणा फडणवीस यांनी लगावला.
सरकार पाडण्यासाठी आमचे प्रयत्न आणि रस नाही, अंतर्विरोधाचं हे सरकार चालेल तोपर्यंत चालेल, पडेल तेव्हा बघू काय करायचं. देशात काय चालतं, राज्यात काय चालतं हे मला माहिती नाही, मी महाराष्ट्रातील नेता आहे. भाजपची नवी कार्यकारिणी अद्याप तयार झालेली नाही, त्यानंतर संसदीय समिती होईल, त्यामध्ये नियुक्त करण्याचा अधिकार पंतप्रधान, पक्षप्रमुखांचा आहे, माझी नियुक्ती झालेली नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

