राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मागील सहा महिन्यांपासून देश बंदीवासात असल्याप्रमाणे आहे. पहिले तीन महिने कठोर बंदी पाळल्यानंतर देश आर्थिक खाईत गेला. हे आर्थिक चक्र हलविण्यासाठी लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. उद्योगधंदे सुरू झाले. देशांतर्गत प्रवासासाठी विशेष रेल्वे गाड्या सुरू झाल्यात मात्र, जिल्हांतर्गत बंदी कायम होती. जिल्हांतर्गत एसटी सेवा बंद असल्याने नागरिक हैराण झाले होते. परंतु, आता राज्य सरकारने आंतरजिल्हा एसटी सेवा पून्हा तब्बल 6 महिन्यानंतर सुरू केली आहे.
राज्यात आंतरजिल्हा एसटी प्रवासाला परवानगी देण्यात आल्याने आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसने प्रवास करता येणार आहे. यासाठी बस किंवा प्रवाशांना परवानगी किंवा ई-पासची गरज लागणार नाही. एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं गरजेचं आहे.
कोरोना महामारीमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्यांतर्गत एसटी सेवा बंद होती. परंतु आता जिल्हाबंदी सरकारने उठवली आहे. मात्र खासगी वाहनांसाठी ई-पास लागू राहणार आहे.

