FarmersShivSenaमुंबईराजकारण

पीकविमा कंपन्यांविरोधात शिवसेनेचा मोर्चा; पात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ न केल्यास हा मोर्चाच बोलेल – उद्धव ठाकरे यांचा सूचक इशारा

शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई मिळालेली नसल्याने शिवसेनेतर्फे याविरोधात आज (बुधवारी) भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा वांद्रे – कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘भारती अॅक्सा’ विमा कंपनीवर नेण्यात आला होता, या मोर्चात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री रामदास कदम, खासदार विनायक राऊत, शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना सचिव आदेश बांदेकर, आमदार अनिल परब, आमदार सुभाष भोईर, आमदार रवींद्र फाटक यांच्यासह शिवसेनेचे नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

सरकारच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचल्याच पाहिजेत. कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांची नावे बँकांनी लावली पाहिजेच, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मोर्चादरम्यान केली. काही ठिकाणी कर्जमाफीचे प्रमाणपत्र दिले गेले, मात्र कर्जमाफी झालीच नाही. हे सगळे प्रकार टाळण्यासाठी आम्ही आजचा मोर्चा काढला असून महाराष्ट्रातल्या इतर कंपन्यांवर प्रतीक म्हणून आमची शिष्टमंडळे जातील. शिवसेना कायम शेतकर्‍यांसोबत आहे. आम्ही ज्यांचे अन्न खातो त्यांच्याशी कधीही गद्दारी करणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

खासगी विमा कंपन्या आणि बँकांना इशारा देताना उद्धव ठाकरे यांनी निर्वाणीचा इशाराही दिला. दिलेल्या मुदतीप्रमाणे १५ दिवसांत खासगी कंपन्यांनी शेतकऱ्यांची प्रलंबित प्रकरणे निकाली न काढल्यास, तसेच बँकांनीही १५ दिवसांच्या आत पात्र शेतकऱ्यांची कर्जे माफ न केल्यास हा मोर्चाच बोलेल, असा सूचक इशारा उद्धव यांनी मोर्चात दिला. तसेच मोर्च्यादरम्यान बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षावर देखील टीकेची झोड उठवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button