विरोधी पक्षाने महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळय़ा गोष्टी ते दिल्लीत जाऊन करताहेत – मुख्यमंत्री
मुंबई : गेल्या तीन – चार दिवसांपासून मुख्यमंत्र्यांच्या अनलॉक मुलाखतीची चर्चा होती. संजय राऊत यांनी ट्विटरवरून या मुलाखतीची उत्सुकता वाढवली होती. त्या मुलाखतीचा एक बाग आज सामनात प्रसिद्ध झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच प्रश्नांना दिलखुलास, मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत. ‘अन्लॉक’ म्हणजे एकदम मोकळी मुलाखत असे राऊत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन, पुनश्च हरिओम म्हणजे काय, त्यांना डॉक्टर व्हायचे होते इथपासून ते विरोधकांची दिल्लीवारी या सर्व मुद्द्यांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मोकळेपणाने उत्तरं दिली आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फार फिरायला लागलेत…
– या प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी त्यावर काही बोलणार नाही.
फडणवीस अलिकडेच दिल्लीत होते….
– तिथली कोरोनाची परिस्थिती बघत असतील.
आणि त्यांचं असं म्हणणं आहे की…
– पण तिथल्या परिस्थितीबद्दल काही बोलले
नाहीत ते.
दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत…
– याचे कारण काय? तर त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड
दिल्लीत दिल्यामुळे सगळय़ा गोष्टी ते दिल्लीत जाऊन करताहेत. असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी राज्यातील भाजप नेत्यांना लगावला.
कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यानंतर कोविड – 19 मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी राज्यातील सर्व भाजप नेत्यांनी हा फंड पीएम केअर्सला दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी नुकतेच दिल्लीवारी केलेल्या भाजप नेत्यांना लगावला.
यावर राऊत म्हणाले, हे तुमचं म्हणणं जरी खरं मानलं तरी राज्यातल्या परिस्थितीचे अपडेटस् त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटून देणे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे ही चर्चा मुख्यमंत्र्यांशी करायला पाहिजे…
– असं कोण काय म्हणतंय, काय करतंय इकडे लक्ष देत नाही. मी पुनः पुन्हा सांगतोय, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठीक आहे. हे बोलतील. बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल. कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत. असा टोला मुख्यमंत्र्यानी लगावला.
अच्छा! म्हणजे पोटदुखी हेही एक लक्षण आहे?
– लक्षणे वेगवेगळी आहेत. नक्कीच!
सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आहेत असं ऐकलंय…
– हो, सर्दी, खोकला, ताप, चव जाणे, वास जाणे, अंगावर रॅश येणं, काहीजणांची बोटं
काळी-निळी पडतात.
त्याच्यात आता हे नवीन लक्षण…पोटदुखी!
– पोटदुखी हे लक्षणही असू शकेल.
अच्छा! मग हे पोटदुखीतून आलंय तर…
यानंतर मुख्यमंत्र्यांनी गमतीचा भाग सोडून कोरोनाच्या कोणत्याही लक्षणाकडे नागरिकांनी दुर्लक्ष करू नये असा महत्त्वाचा सल्लाही दिला. ते म्हणाले,
– हे, ठीक आहे, पण आता मी थोडंसं गांभीर्याने सांगतोय. ही मस्करी नाहीय. आपल्यात
एखादा अनपेक्षित बदल झालाय असे काही लक्षात आलंय तर तेही कोरोनाचं लक्षण असू शकतं असा एक अभ्यास आहे.
‘‘लॉकडाऊन उठवा, हे उघडा आणि ते उघडा असे सांगणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत काय? पुनश्च हरिओमचा अर्थ समजून घ्या.’’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच, विरोधी पक्षाने राजकीय उत्सव साजरे करू नयेत. संकटाचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागावे, असा दणकाही उद्धव ठाकरे यांनी दिला.
कोरोनाच्या या कठीण काळात मी देशभरातल्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती पाहिल्या, संवाद ऐकले, भाषणं ऐकली, पंतप्रधान मोदी यांचंही ऐकलं. किंबहुना तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा ते ऐकताना सारखं असं वाटायचं की, जागतिक आरोग्य संघटनेलासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच मार्गदर्शन करताहेत की काय! इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून दिसत होतं. हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे आलं कुठून?
– याला असं काही नेमकं उत्तर नाही देता येणार. पण एक गोष्ट सांगतो, लहानपणी त्या काळात एक प्रश्न लहान मुलांना नेहमी विचारला जायचा की मोठा झाल्यावर तू कोण होणार? त्यावेळेला मुलं आपापली इच्छा व्यक्त करायची. अर्थात प्रत्येक जण त्या काळी दिलेल्या उत्तराप्रमाणे घडलाच असेल किंवा घडला नसेलही. परंतु माझ्यासाठी म्हणाल तर वैद्यकीय शास्त्र्ा हा अगदी त्या लहान वयापासूनच कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. अगदी माझ्या मनात एक शक्यता त्या काळात अशीही डोकावत होती की, डॉक्टर व्हावं. अर्थात नाही झालो ते बरंच झालं.
अरे वा…!
– हो, पण डॉक्टर व्हावं म्हणून तसा प्रयत्न मी कधी केला नाही. पण मी मधल्या काळात होमिओपॅथीचा अभ्यास मात्र जरूर करत होतो. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डॉक्टरीची आवडही यावेळी मोकळेपणाने सांगितली.
केंद्र राज्याला काय मदत करू शकते?
– केंद्र आणि राज्य यांना एकत्रित काम करावेच लागेल. पंतप्रधान मोदी हे अधेमधे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेत असतात आणि कोरोनाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपण त्यांच्याकडे मांडतो त्याबाबत त्यांची मदत होते.
आपल्याला जी 38 हजार कोटींची मदत केंद्राने द्यायचं कबूल केलं होतं ते पैसे राज्याला मिळाले
का?
– येताहेत… येताहेत…
हळूहळू येताहेत. लॉकडाऊन जसा हळूहळू उठतोय तसे ते पैसे हळूहळू येताहेत…*
– सगळ्यांचेच उत्पन्न घटलेलं आहे. दूध उत्पादकांचे घटले आहे. शेतकऱयांचे घटलेच आहे. म्हणजे सरकारचे पण घटलेच आहे.
मग महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय प्रयत्न करतेय? कारण त्याशिवाय हे राज्य चालवता येणार कसे?
– कोणाकडून वसूल करणार?
कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत, असे आपले मंत्री म्हणतात…
– मान्य आहे मला, पण शेवटी महसूल वाढवण्यासाठी कोणाचे खिसे कापायचे?
माझा प्रश्न तोच आहे. त्यासाठी आपण काय उपाययोजना करताय?
– उपाययोजना सुरू आहेत. शेवटी पटकन ‘पी हळद आणि हो गोरी’ असा उपाय कोणाकडेच नाहीय. तसा उपाय असता तर या परिस्थितीला संकट तरी कसं म्हणता येईल. संकट किंवा आपत्ती असे आपण म्हणतो तेव्हा ती परिस्थिती गंभीर आहे हे आपण मान्य करायला हवं. आपल्या देशात आणि आपल्या राज्यात एपीडिपिक ऍक्ट शंभर वर्षांपूर्वीचा होता. इंग्रजांच्या काळातला. तो आता शंभर वर्षांनंतर पुनरुज्जीवित केला. तो का केला? कारण पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झालीय. केंद्राने त्याच्याही पुढे आणखी एक पाऊल टाकत थोडासा आणखी कडक डिझॅस्टर ऍक्ट केला आहे. तो का करावा लागला? याचं कारण, संकट तसेच गंभीर आहे.

