उस्मानाबाद: भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे.त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यासंसबंधीची अधिकृत घोषणा केली आहे. “एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी म्हणजे २३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील”, असे जयंत पाटील यांनी जाहीर केले आहे. जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रीया दिली आहे. एकनाख खडसे हे महाविकासआघाडीच्या कुटुंबात येत आहेत त्यांचे स्वागत आहे,अशा शब्दांत त्यांनी खडसेंचे महाविकासआघाडीत स्वागत केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांवर खडसेंची वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही दबक्या आवाजात विचारला जात आहे.
साध्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उस्मानाबादच्या दौऱ्यावर असून, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करत आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हसतमुखाने खडसेंच्या निर्णयाचे स्वागत केले. ‘एकनाथ खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत आहेत. त्यांचे स्वागत आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
