कोपर्डी बलात्कार – हत्येला तीन वर्षे पूर्ण; सरकारची आश्वासने मात्र अपूर्ण
कोपर्डीत तीन वर्षांपूर्वी म्हणजे 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. नववीत शिकणाऱ्या 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील तीन नराधमांनी बाईकवरुन पाठलाग केला. त्यानंतर निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अत्याचार केला आणि तिची अमानुष हत्या केली. या घटनेनंतर राज्यासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. पीडित कुटुंबाला आजही पोलीस संरक्षण देण्यात येत आहे. या गावामध्ये घटना घडून तीन वर्षे झाली असली तरीही आज गावामध्ये महिला आणि मुलींमध्ये तेवढीच भीती दिसून येते. रात्र झाली की मुली घराच्या बाहेर सहसा पडत नाहीत. गावामध्ये शाळा नसल्याने एस टी आली नाही तर मुलींची शाळा त्या दिवशी बुडते. सरकारने गावामध्ये माध्यमिक विद्यालय सुरू करू असे आश्वासन दिले होते, मात्र ते पूर्ण केले नाही. गावामध्ये सरकारी दवाखाना, कुळधरण मध्ये पोलीस चौकी सुरू करू, कोपर्डी ते राक्षसवाडी रस्त्याचे डांबरीकरण करू, ही आश्वासनेही पूर्ण झाली नाहीत.
कोपर्डी बलात्कारानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या घटनेचा निषेध म्हणून मराठा क्रांती मूकमोर्चे निघाले. औरंगाबादेत 9 ऑगस्ट 2016 रोजी पहिला मराठा मूक मोर्चा निघाला. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात विशाल संख्येने मोर्चे काढण्यात आले. या मोर्चांमधून पीडितेला न्याय मिळवण्यासाठी जनसमुदाय एकटवला होता. या वेळी पीडितेच्या आईने सांगितले, की माझ्या मुलीला न्याय मिळण्यासाठी तिन्ही नराधमाना फाशीची शिक्षा द्यावी, सत्र न्यायालयात फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली, मात्र खंडपीठामध्ये याचिका दाखल आहे.