हाथरस येथील युवतीवर झालेला बलात्कार आणि तिच्या अमानुष हत्येच्या निषेध करण्यासाठी काँग्रेस उद्या ५ ऑक्टोबरला सर्व राज्यांमध्ये जिल्हापातळीवर सत्याग्रह करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस व खा. के. सी. वेणुगोपाल यांनी दिली.
वेणुगोपाल यांनी आरोप केला आहे की, उत्तर प्रदेशच्या सरकारने हे प्रकरण अतिशय बेजबाबदारपणे हाताळले. त्या मुलीला जीवन्तपणी योग्य उपचार – मदत केली नाही. मृत्यूनंतर तिच्यावर कुटुंबाच्या संमतीशिवाय, अंत्यविधिचे संकेत गुंडाळून रात्रीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१ ऑक्टोबरला काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पीडित कुटुंबाच्या सांत्वनासाठी जात होते त्यावेळी त्यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अडवले. राहुल गांधी यांना पोलिसांनी धक्का-बुक्की केली. राहुल व प्रियंका यांच्यासोबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली.
उत्तरप्रदेश सरकारच्या दबावाला बळी न पडत ३ ऑक्टोबरला राहुल व प्रियंका गांधी हाथरसला गेलेत. पीडितेच्या कुटुंबाचे सांत्वन केले. त्यांना आश्वासन दिले की, त्यांना न्याय मिळेपर्यंत त्यांच्यासोबत लढत राहतील.