BJPPoliticsराजकारण

अखेर खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

शुक्रवारी हजारो कार्यकर्त्यांसह एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीची अधिकृत घोषणा

मुंबई : भाजपाचे  ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबद्दलची चर्चा अखेर खरी ठरली आहे. काही वेळेपूर्वीच खडसेंनी भाजपचा राजीनामा दिला असून, येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आताच दिली आहे.

याबाबत माहिती देताना पाटील यांनी सांगितले की, एकनाथ खडसे यांनी स्वतः फोन करून भाजपचा राजीनामा दिल्याची माहिती दिली. त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार येत्या शुक्रवारी त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला आहे. त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकारीही असू शकतात. त्यांनाही पक्षात घेतले जाईल. येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या संपर्कात असलेले उत्तर महाराष्ट्रातील बडे नेतेही पक्षप्रवेश करू शकतील. त्यांचेही आम्ही स्वागत करू, अशी माहितीही पाटील यांनी दिली.

अखेर एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना आता लवकरच ब्रेक मिळणार म्हणजेच नवरात्रीतील घटस्थापनेचा मुहूर्त खडसेंनी चुकवला असला तरी अष्टमीच्या महूर्तावर खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील हे आता निश्चित झाले आहे.

गेल्या चार दशकापासून उत्तर महाराष्ट्रात आणि राज्यात भाजपच्या विस्तारात खडसेंचा मोठा वाटा राहिला आहे. गोपीनाथ मुंडे  यांच्यासोबत त्यांनी भाजपच्या वाढीमध्ये मोठं योगदान दिलं आहे. तेव्हा अशा मोठ्या नेत्याला पक्षात घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून खडसेंना काय मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

खडसे यांना गृहनिर्माण, जलसंपदा किंवा कृषी अशा मोठ्या खात्याची जबाबदारी मिळण्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. दरम्यान, गृहनिर्माण खातं सध्या जितेंद्र आव्हाड तर जलसंपदा खातं जयंत पाटील यांच्याकडे आहे. आव्हाड आणि पाटील हे दोघेही राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेते आहेत. अशावेळी त्यांच्याकडून मोठ्या खात्याची जबाबदारी काढून ती भाजपमधून येणाऱ्या खडसेंना दिली जाणार का? असा प्रश्नही अनेकांना पडत आहे.

तर, कृषी खातं हे शिवसेनेच्या दादाजी भूसे यांच्याकडे आहे. त्यामुळं शिवसेना आपल्या गोटातून कृषी सारखं जनतेशी जोडणारं खातं सोडणार का, हा मोठा प्रश्न आहे. यावर पर्याय म्हणून खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर ठाकरे सरकारच्या खात्यांमध्ये फेरबदलाचे संकेत व्यक्त होत आहेत. कृषी खातं राष्ट्रवादीकडे घेऊन शिवसेनेला राष्ट्रवादीच्या गोटातील एखादं खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button