राज्य शासनाची रेस्टॉरन्ट्स सुरु करण्यासाठीची तत्वे तयार!
मुंबई | राज्यात हळूहळू एक एख बाबी सुरु होत आहे. राज्यात अनलॉक – 5 चा टप्पा सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रेस्टॉरन्ट्स असोसिएशनच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. गेल्या ६ महिन्यांपासून रेस्टॉरन्ट्स बंद असल्याने प्रचंड नुकसान होत असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. रेस्टॉरन्ट्स सुरू करण्याची कार्यपद्धती ठरवली जाईल आणि त्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्य शासनाने रेस्टॉरन्ट्स सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत. ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरन्ट्स सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. “कोव्हिडवर लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनासोबत जगताना अत्यंत काळजीपूर्वक पुढे जावं लागत आहे. रुग्णांमध्ये पोस्ट कोव्हिड लक्षणं दिसून येत आहेत. आर्थिक बाबींसाठी जबाबदारीने आपण काही पावलं टाकायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक व्यवहार बंद होते, ते आपण एक-एक करुन सुरु करत आहोत”.
“व्यवहार बंद ठेवणे हा आवडीचा विषय असूच शकत नाही. त्यांच्याकडून कररुपात राज्य शासनाला मिळणारा महसूलही बंद आहे. केंद्र शासनाकडून जीएसटीची काही हजार कोटी रुपयांची रक्कम मिळणे बाकी आहे. या सर्व आर्थिक अडचणींची जाणीव असल्याने मर्यादा पाळून आणि जबाबदारीचे भान ठेऊन व्यवहार सुरळीत करण्याचा आपला प्रयत्न,,” असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.कोव्हिडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्दैवाने काही जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करु, ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्या दृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ती त्यांना अडचणीत आणण्यासाठी नक्कीच नाही, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
राज्य शासनाने ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ हे अभियान राबविण्यास सुरुवात केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते म्हणाले की, अवघा महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, त्यात हॉटेल-रेस्टॉरंट व्यावसायिकही आलेच. जशी माझी जबाबदारी इतरांप्रमाणे तुमच्याप्रती आहे तशीच तुमची जबाबदारी ही तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रती आहे.
कोविडमुळे कोरोना योद्धेही बाधित झाले आहेत, दुर्देवाने काही जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण सुरळीत करू ती अतिशय काळजीपूर्वक, जबाबदारीचे भान ठेवून सुरु करत आहोत. त्याचदृष्टीने रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी एसओपी तयार करण्यात आली असल्याचे श्री.ठाकरे यांनी सांगितले.
आता सण उत्सव आणि पावसाचे दिवस आहेत. गर्दी टाळणे गरजेचे आहे. लोकांचा संयम हा देखील महत्त्वाचा विषय आहे. पण कोरोनासोबत जगताना आता आपल्या प्रत्येकाला आपल्या जीवनशैलीत बदल करावा लागणार आहे. मास्क लावणे, हात धुणे, शारीरिक अंतर राखणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. रेस्टॉरंट सुरु करताना या तीनही गोष्टीची अत्यंत काळजी घेणे अत्यावश्यक ठरणार आहे रेस्टॉरंटमधील शेफ, सेवा देणारे व इतर कर्मचाऱ्यांची आरोग्यविषयक काळजी घेणे महत्त्वाचे राहणार आहे. त्यांनी मास्क लावणे, हात धुणे गरजेचे आहे. रेस्टॉरंटची सुरक्षितता आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या विषाणूने बाधित ८० टक्के लोकांना लक्षणे दिसून येत नसली तरी त्यांच्याकडून विषाणूचा प्रसार होऊ शकतो हे गंभीर असल्याचे स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले की, एसओपीचे पालन, स्वच्छता, सुरक्षितता, शारीरिक अंतर पाळणे ही रेस्टॉरंटसाठीची रेसिपी आहे. आपले नाते विश्वासाचे असल्याचे सांगताना महाराष्ट्राला आपलं कुटुंब मानणारी प्रत्येक व्यक्ती या जबाबदारीचे भान ठेवून यात सहभागी होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सर्व संबंधितांनी एकत्रित बसून मार्गदर्शक तत्वे अंतिम करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सर्व रेस्टॉरंट व्यवसायिकांची पुन्हा एकदा बैठक घेऊन एसओपी फायनल करू असे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले.
बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या एएचएआर संघटनेचे शिवानंद शेट्टी, एनआरएआर संघटनेचे अनुराग कटरियार, गुलबक्षसिंह कोहली, महाराष्ट्र हॉटेल फेडरेशनचे सतीश शेट्टी, प्रदीप शेट्टी, दिलिप दतवाणी, रियाझ अमलानी, प्रणव रुंगटा, सुकेश शेट्टी, एस. के.भाटीया आदी मान्यवर उपस्थित होते.

