Health & FitnessMaharashtra Govआरोग्यमुंबई

शरद पवारांच्या हस्तक्षेपानंतर टाळेबंदी संदर्भात काही प्रमाणात अटी शिथिल

राज्यात देण्यात येणारी सूट जनतेसाठी अपर्याप्त

मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ३० मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली . मात्र राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी काही अटी शिथिल कराव्याच लागतील, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडल्याने सूत्रे हलली आणि त्यानुसार काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी लॉकडाऊन ४. ० संदर्भात काही महत्वाच्या सूचना दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शरद पवार यांनी लॉकडाऊनमुळे ठप्प झालेली राज्यातील व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या . पवारांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार , आरोग्य मंत्री राजेश टोपे , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण उपस्थित होते .

लॉकडाऊन आणि अर्थव्यवस्था यांच्यात समतोल राखणे महत्वाचे असल्याचे पवारांनी म्हंटले आहे . लॉकडाऊनच्या काही अटी शिथील करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. याकरता दररोज ठराविक वेळ निश्चित करून शासनाने आवश्यक सवलतींची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्याची व्यवस्था करावी. दुकाने, कार्यालये, खाजगी क्षेत्रातील आस्थापने टप्प्याटप्प्याने उघडली जातील याकडे कृपया पहावे, असे शरद पवार यांनी म्हटले

टाळेबंदीत वाढ करताना रेड झोन गळता अन्यत्र राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येईल अशा पद्धतीने नियोजन करावे, अशी सूचना शरद पवार यांनी गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केले होते. परंतु, ठाकरे यांनी सावध भूमिका घेतल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर होता . यावर मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलाविली होती. शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी या वेळी उपस्थित होते.

तसेच लॉकडाऊनमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठीही सरकारने पावले उचलावीत, अशी सूचना पवारांनी मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याचा जनतेत विश्वास निर्माण व्हावा म्हणून राज्याचे मंत्री आणि अधिकारी यांची उपस्थिती वाढणे आवश्यक आहे. मंत्री व अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी योग्य त्या सूचना निर्गमित व्हाव्यात, असे शरद पवार यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता राज्यातील निर्बंध कायम ठेवण्यात येतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधताना सोमवारी रात्री स्पष्ट केले होते.

राज्यावर आर्थिक संकट उभे राहू नये म्हणून टाळेबंदीच्या काही अटी शिथिल करून राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर आणावी लागेल. यासाठी दररोज काही ठरावीक वेळ निश्चित करावा, अशी सूचना शरद पवार यांनी बैठकीत केली.

शरद पवारांच्या सूचना खालीलप्रमाणे :

  • * शैक्षणिक वर्ष सुरू होण्यास विलंब लागणार असल्याने वेळीच उपाय योजण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि शैक्षणिक संस्था या साऱ्यांचेच नुकसान टाळण्यासाठी तसेच शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून तज्ज्ञांचा अभ्यास गट स्थापन करावा.
  • * मजूर मोठय़ा प्रमाणावर स्थलांतरित झाल्याने उद्योगांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मजूरांना परत आणण्यासाठी नियोजन करावे.
  • * राज्यातील तरुण पिढीला व मराठी तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांच्यासाठी कृती कार्यक्रम तयार करावा.
  • * उद्योग आकर्षित होण्यासाठी प्रोत्साहनपर धोरण तयार करावे.
  • * रस्ते वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न व्हावेत. रेल्वे आणि विमानसेवा प्रू्ववत करण्याकरिता कालबद्ध कार्यक्रम तयार करावा.
  • * करोना लगेचच हद्दपार होण्याची शक्यता नाही. त्यासाठी जनतेत व्यापक जनजागृती करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button