युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिंकली सांगली-कोल्हापूरच्या पुरग्रस्तांची मने
मुंबई, ता. २० : एकीकडे फडणवीस सरकार सांगली आणि कोल्हापूरच्या महाप्रलयकारी पुरात अडकलेल्या पूरग्रस्तांना केवळ शाब्दिक दिलासा देत होते. त्याचवेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र पुराचा फटका बसलेल्या अनेक गावात साफसफाईचे मोठे कार्य करत होते. रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत करून युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मानवतेचा अलौकीक परिचय दिला असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.
अतिवृष्टी आणि महापुराचा जबरदस्त तडाखा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो लोकांना बसला. एकीकडे अर्धे राज्य महापुराचा सामना करत असताना महाराष्ट्राचे पालकत्व ज्यांच्याकडे आहे, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने विदर्भात वातानुकुलीत वाहनातून मतांचा जोगवा मागत फिरत होते. पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कोल्हापुरात तर कृष्णा नदी कोपल्यामुळे अर्धे सांगली शहर जलमय झाले होते. पूरग्रस्तांना तातडीने पुराच्या वेढ्यातून बाहेर काढणे, पूरग्रस्तांसाठी निवाऱ्याची व्यवस्था, पुरात अडकलेल्या लाखो लोकांना जेवणाची पाकिटे पुरविणे, आदी गोष्टींची तातडीने पूर्तता करण्यात युती सरकार साफ अपयशी ठरले.
शासकीय मदतीची वाट न पाहता महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी तातडीने राज्यभर मदतफेऱ्या काढाव्यात . तसेच पुरग्रस्त भागात युद्धपातळीवर स्वछता अभियान राबविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरून केले. या आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला आणि युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पुराचा फटका बसलेल्या गावातील साफसफाईसाठी सरसावले. कोल्हापूर जिल्ह्यातील दानवड आणि सांगली जिल्ह्यातील भुवनेश्वरवाडी, कोकरूड ता.शिराळा,औदुंबर.ता.वाळवा,सांगलीवाडी तसेच सातारा जिल्ह्यातील रेठरे खुर्द,ता.कराड या गावात हातात खोरे आणि पाटी घेऊन युवक काँग्रेसचे कार्यकर्ते काळ आणि वेळेचे भान न ठेवता सफाई अभियानात कार्यरत राहिले. अखेर जिद्द आणि उत्साहाच्या जोरावर युवक काँग्रेसच्या या सर्व कार्यकर्त्यांनी पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी झालेल्या तात्काळ मदतकार्यात मोठे योगदान दिले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सांगली आणि कोल्हापूर शहराजवळ केलेल्या या सफाई अभियानाची दखल स्थानिक आणि राज्य पातळीवरील सर्वच प्रसारमाध्यमांनी घेतली.

———————————–
काँग्रेसने पुन्हा एकदा दिला मानवतेचा परिचय
केंद्र आणि राज्यात अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने नेहमीच राजकारणातून समाजकारणाचा वसा जपला आहे. १९६७ मध्ये कोयनानगर परिसरात मोठा भूकंप झाला होता. त्यावेळी वसंतराव नाईक राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि तत्कालीन गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांनी अहोरात्र परिश्रम करत भूकंपग्रस्त भागात मुक्काम ठोकून भूकंपग्रस्तांना दिलासा तर दिलाच शिवाय अवघ्या काही वर्षात भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले. बाळासाहेब देसाई यांनी भूकंपग्रस्तांसाठी दिलेले अलौकिक योगदान बघून प्रख्यात लेखक प्र. के. अत्रे यांनी बाळासाहेब यांना लोकनेते ही पदवी दिली. हीच लोकसेवेची परंपरा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे पार पाडली. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे.



