नदी काठच्या गावांना मगरींची भीती, वन विभागाचा नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश
सध्या चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात सातत्याने सुरु असलेल्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. काही ठिकाणी पाणी पात्राबाहेर गेल्याने आश्रयासाठी मगरी नदी काठावर आल्याचे दिसून येत आहे. हरिपूर येथे रेस्क्यू टीमला नदीच्या काठावर दोन मोठ्या मगरी निदर्शनास आल्या. या मगरी तब्बल १२ ते १५ फूट लांबीच्या असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
दरम्यान कृष्णा नदीच्या काठी मागील 15 वर्षात मगरीच्या हल्ल्यात 10 बळी आणि 12 जण जखमी झाले. त्यामुळे वन खात्याने या मगरींचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. गेल्या काही वर्षात नदीपात्रात मगरीकडून होणारे हल्ले वाढले असून अनेक ठिकाणी मगरी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. त्यामुळे नदीकाठावरील अनेक गावे मगरींच्या भीती खाली आहेत.