शिवजयंती निमित्त मुख्यमंत्र्यांची ही घोषणा !
पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने शिवनेरी दूमदूमुन गेला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात उत्साह आहे. शिवरायांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरीवर शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला. या समारंभात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “माझं हे दुसरं वर्ष आहे. हा बहुमान जिजाऊ, शिवाजी महाराज आणि तुमच्यामुळं लाभलेलं आहे. आता कोरोनाबरोबर आपलं युद्ध सुरु आहे” असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी म्हटलं आहे.
ते त्यांच्या भाषणात म्हणतात, “सगळं ठिक आहे, फक्त तोंडावर मास्क आहे. या भूमीत, या मातीत हे तेज जन्माला आलं, त्याच मातीतील आपण लेकरं आहोत. छत्रपतींनी ज्या लढाया केल्या. जो स्वराज्यावर चालून आला, त्याची विल्हेवाट कशी लावली हे तुम्हाला पुन्हा सांगण्याची गरज नाही. आता तसं युद्ध नसलं तरी करोनाबरोबर आपलं युद्ध सुरू आहे. या युद्धात मास्क ही ढाल आहे. अनेक राजे झाले. अनेक लढायासुद्धा झाल्या पण छत्रपतींचं वेगळेपण काय तर युद्ध जिंकण्यासाठी जी जिगर आणि प्रेरणा लागते ती शिवाजी महाराजांनी दिली,”.
शिवजन्म सोहळा! pic.twitter.com/Kz8lhr0rCR
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 19, 2021
“करोनाशी लढतांना छत्रपतींकडून प्रेरणा व जिद्द आम्हाला मिळते आहे. राजकारण बाजुला पण, आमच्या सगळ्यांच्या मनात शिवप्रेम आहे. आपल्या सगळ्यांना जोडणारे शिवराय आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं तेज संपूर्ण जगात पसरवू,” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. विरोधकांना टोला सुद्धा त्यांनी मारला, ते पुढे अस बोलले की, “काही साप आहेत. ते वळवळ करतायेत, त्यांना ठेचायचं असतं आणि आपण पुढे जायचं असतं !” या विशेष कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संभाजीराजे छत्रपती, मंत्री आदित्य ठाकरेंसह अन्य मान्यवरसुद्धा उपस्थित होते.