संजय राऊतांना वक्तव्य मागे घेण्यास सांगा, अथवा तुमचीही हीच भूमिका आहे का? मार्डचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई : शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी डॉक्टरांना काय कळते असे विधान केले त्यानंतर राज्यभरातून राऊतांवर टीका झाली. डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनेही संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. यासाठी मार्ड संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहीले आहे. संजय राऊत यांनी केलेले विधान त्यांना मागे घेण्यास सांगा किंवा ‘आपली सुद्धा हीच अधिकृत भूमिका आहे असे ग्राह्य धरावे का?’ असा प्रश्न मार्डने पत्रातून मुख्यमंत्र्यांना केला आहे.
एकीकडे मुख्यमंत्री डॉक्टर्स कोरोना योद्धा आहेत, असं म्हणतात तर त्यांचेच सहकारी संजय राऊत अशी वल्गना करत आहेत. डॉक्टरांना काय कळते ? हे ऐकवून दाखवत असताना याचा अर्थ काय घ्यायचा ? असा प्रश्न मार्डने मुख्यमंत्री ठाकरेंना केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून आम्ही रात्रंदिवस जीवाची बाजी लावून काम करत आहोत. अनेकांनी कित्येक दिवस घरदाराचं, घरच्यांचं तोंड पाहिलं नाहीये. अनेक डॉक्टर्स मृत्यूच्या दाढेतून परत आले आहेत. ते फक्त हेच ऐकण्यासाठी का ‘डॉक्टरांना काय कळतं’? असा सवाल मार्डने केला.
संजय राऊतांनी केलेले वक्तव्य राज्यातील तरुण डॉक्टरांचे खच्चीकरण करणारे असून आपली सुद्धा ही भूमिका ग्राह्य धरावी का? असा सवाल मार्डने मुख्यमंत्र्यांना केला आहे. जर असे नसेल तर संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करून आपले वक्तव्य मागे घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली. असे होत नसेल तर ही आपली देखील हीच अधिकृत भूमिका आहे असं समजून तरुण डॉक्टर्स याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही, इशारा मार्डने दिला आहे.

