अती घाई संकटात नेई…, अनलॉकमध्येही जनतेने संयम दाखवावा – शिवेसेना
मुंबई : दोन ते अडीच महीने देश लॉकडाऊनमध्ये होता. सर्व उद्योगधंदे ठप्प पडले होते. त्यामुळे देशाचे, राज्याचे अर्थचक्राचे गाडे खोलवर रुतले गेले. अडीच महीने बंद अवस्थेत राहील्यानंतर आता देशाचे अर्थचक्र हलविण्यासाठी आता 1 जून पासून अनलॉक 1 ची घोषणा केली. महाराष्ट्रात पुनश्च हरीओम म्हणत काही अटीशर्थीवर उद्योगधंदे सुरू करण्यात आले. मात्र, अनलॉकच्या पहिल्याच दिवसापासून कोरोना आता पळाल्यासारखा निर्धास्तपणा आणि गर्दी मुंबईसह अन्य शहरातही दिसत आहे. त्यामुळे ही गर्दी जीवावर बेतण्याची भीती शिवसेनेने व्यक्त केली आहे. अती घाई संकटात नेई हे नागरीकांनी लक्षात घेतले पाहीजे. लॉकडाऊन काळात जो संयम जनतेनी दाखवला तोच संयम अनलॉक काळातही दाखवला पाहीजे असे आवाहन शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून केले आहे.
लॉक डाऊन शिथीलतेला गर्दीच्या बेशिस्तीचे असे गालबोट लागणार असेल तर कसे व्हायचे? मुंबईसारख्या शहरात हे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा लढा अजून सुरूच आहे. तो सुरू ठेवून थांबलेल्या अर्थचक्राला हळूहळू गती देणे हाच लॉक डाऊनच्या शिथीलतेचा अर्थ आहे. शिथीलतेच्या काळात अर्थचक्र सुधारले, पण घाईगडबडीमुळे जीवनचक्र बिघडले असे व्हायला नको. अर्थचक्र असो की जीवनचक्र, किती काळ थांबवणार हादेखील प्रश्न आहेच. असे शिवसेनेने आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
आजचा सामना –
अति घाई, संकटात नेई’ हे सगळ्यांनीच लक्षात घेतले पाहिजे. लॉक डाऊन काळात जो संयम जनतेने दाखवला, **तोच संयम ‘**अनलॉक’ **काळातही दाखवायला हवा. त्यातच सगळ्यांचे भले आहे. सरकार आपल्या परीने थांबलेले गाडे सुरळीत करण्याचा आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. फक्त ‘**अनलॉक’**ला घाईगडबडीचे गालबोट लागू नये इतकेच! अडीच महिन्यांचे लॉक डाऊन शिथील होऊन आता चार-पाच दिवस झाले. ठप्प झालेली अर्थव्यवस्था आणि थांबलेले जनजीवन पुन्हा पूर्ववत व्हावे यासाठीच ही काही प्रमाणातील शिथीलता करण्यात आली. त्याचा परिणामही दिसून आला. बंद जनजीवन आणि व्यवहार यांच्यात ‘जान’ आली. बाजारपेठांमध्ये चलनवलन सुरू झाले. मुंबईसारख्या महानगरांमध्ये अडीच महिन्यात न दिसलेली वाहनकोंडी दिसू लागली. ‘बेस्ट’ आणि एसटी बसेस जास्त संख्येने धावू लागल्या.
कोरोनासारख्या भयंकर संसर्गजन्य रोगाचा धोका गर्दीमुळे वाढू शकतो. तरीही अर्थव्यवहार आणि जनजीवनाला चालना मिळावी यासाठीच लॉक डाऊनमध्ये सूट देण्यात आली आहे. या काळात घराबाहेर पडणार्या, नोकरदार मंडळींनी हे लक्षात घ्यायला हवे. कोरोनाची पथ्ये आणि सरकारने घालून दिलेले निर्बंध यांचे काटेकोर पालन करूनच वावरायला हवे. दुर्दैवाने काही ठिकाणी जे घडले किंवा घडत आहे ते याच्या विपरीत आहे. लॉक डाऊन शिथीलतेला गर्दीच्या बेशिस्तीचे असे गालबोट लागणार असेल तर कसे व्हायचे? मुंबईसारख्या शहरात हे संकट अद्याप टळलेले नाही. कोरोनाचा लढा अजून सुरूच आहे. तो सुरू ठेवून थांबलेल्या अर्थचक्राला हळूहळू गती देणे हाच लॉक डाऊनच्या शिथीलतेचा अर्थ आहे. मात्र लॉक डाऊन शिथील झाल्यावर पहिल्याच दिवशी मरीन ड्राइव्हवर जॉगिंगसाठी झालेली गर्दी काय किंवा दोन दिवसांपूर्वी कल्याण बसस्थानकावर एसटी बसमध्ये चढण्यासाठी झालेली रेटारेटी काय, हा सगळाच प्रकार चिंता वाढविणारा आहे. अडीच महिन्यांच्या लॉक डाऊनमुळे जे अर्थचक्र आणि जनजीवन ठप्प झाले ते हळूहळू सुरू व्हावे यासाठी टप्प्याटप्प्याने ‘अनलॉक’ करणे गरजेचे होते आणि आहे. त्याचाच पहिला टप्पा सध्या सुरू आहे. मात्र कोणतीही घाईगडबड न करता लोकांनी त्याचे पालन करणे अपेक्षित आहे. लॉक डाऊनमुळे उद्योगांपासून व्यवसायांपर्यंत, नोकरदारांपासून रोजंदारीवर अवलंबून असणार्यापर्यंत सर्वांचीच एकप्रकारची कोंडी झाली. ही कोंडी हळूहळूच फोडावी लागणार आहे. अर्थचक्र असो की जीवनचक्र, किती काळ थांबवणार हादेखील प्रश्न आहेच. टप्प्याटप्प्याने केले जाणारे ‘अनलॉक’ हे याच प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. दुर्दैवाने काही ठिकाणी होणारी गर्दी, केली जाणारी अनावश्यक गडबड या प्रयत्नांना छेद देणारी ठरू शकते. पावसाने ‘उघडीप’ दिली की बळीराजा त्याची शेतीची कामे शिस्तबद्ध पद्धतीने उरकवतो. अनलॉक हीदेखील जनजीवन सुरळीत करण्यासाठी दिलेली एक ‘उघडीप’च आहे. लोकांनी एका शिस्तीत या काळात वावरले पाहिजे.
कोरोना आणि सरकारची बंधने पाळली पाहिजेत. मुंबईसारख्या महानगरात सध्या वाहतूक सेवेवर ताण पडत आहे. हे मान्य केले तरी अशाप्रकारची घाईगडबड सगळ्यांसाठीच धोकादायक ठरू शकते. देशात सध्या दिवसागणिक 10 ते 12 हजार तर राज्यात सुमारे तीन हजार कोरोना रुग्णांची भर पडत आहे. दिल्लीसारख्या ठिकाणीही पुढील महिना-दीड महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते असा इशारा खुद्द तेथील मुख्यमंत्री केजरीवाल यांनीच दिला आहे. मुंबईत मात्र कोरोनाग्रस्तांचा दुप्पट होण्याचा वेग 24.5 वर आला आहे आणि कोरोना मृत्यूदरही तीन टक्के आहे.
ही नक्कीच एक ‘गुड न्यूज’ आहे. तथापि शिथीलतेच्या काळात अर्थचक्र सुधारले, पण घाईगडबडीमुळे जीवनचक्र बिघडले असे व्हायला नको. लोकांनीही त्याची काळजी घ्यायची आहे. ‘अति घाई, संकटात नेई’ हे सगळ्यांनीच लक्षात घेतले पाहिजे. लॉक डाऊन काळात जो संयम जनतेने दाखवला, तोच संयम ‘अनलॉक’ काळातही दाखवायला हवा. त्यातच सगळ्यांचे भले आहे. सरकार आपल्या परीने थांबलेले गाडे सुरळीत करण्याचा आणि कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. फक्त ‘अनलॉक’ला घाईगडबडीचे गालबोट लागू नये इतकेच!

