डिजिटल महाराष्ट्र वार्ता

पालखी मार्गावर टँकरद्वारे पाणीपुरवठा; पालकमंत्री विजय देशमुख यांची माहिती

आषाढी वारी सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात येईल. यासाठी पालखी मार्गावर आवश्यक टँकर व विहीर अधिग्रहण करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री विजय देशमुख यांनी आषाढी वारी सोहळा नियोजनाच्या बैठकीत दिली.

आषाढी वारी २०१९ च्या नियोजनासाठी तुकाराम भवन येथे जिल्ह्यातील सर्व संबंधित जिल्हास्तरीय अधिकारी व मानाच्या पालख्यांचे विश्वस्त यांची बैठक झाली. बैठकीला आमदार सर्वश्री गणपतराव देशमुख, भारत भालके, प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती रजनी देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ-महाराज औसेकर उपस्थित होते.

श्री.देशमुख यांनी सांगितले की, आषाढी वारी सोहळ्यास येणाऱ्या सर्व भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. यामध्ये पिण्याचे पाणी, शौचालये, अखंडीत वीज पुरवठा, सुरक्षा या बाबींना प्राधान्य द्यावे. पालखी मार्गावरील रस्त्यांची कामे, दुरुस्ती, पालखी मुक्कामाची व विसावा ठिकाणची कामे करण्याबरोबरच पालखी विश्वस्तांनी सुचविलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावीत.

डॉ. भोसले यांनी सांगितले की, आषाढी वारी सोहळ्यात स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येणार आहे. वारीपूर्वी आणि वारीनंतर पंढरपुरातील स्वच्छता करण्यात येईल. प्रदक्षिणा मार्गावर खचखडी राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल. प्रशासनामार्फत वारकऱ्यांना आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. आषाढी वारीत करावयाच्या कामांच्या‍ नियोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येऊन त्यांना त्यानुसार कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यापुढेही आवश्यकता भासल्यास संबंधितांची बैठक घेऊन कामांचा आढावा घेण्यात येईल.

पालखी मार्गावर सर्व सुविधा देण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले असून वारकाऱ्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात २७ टँकर, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात २२ टँकर पुरविण्यात येणार असून मानाच्या अन्य पालखी सोहळ्यात आवश्यकतेनुसार टँकर पुरविण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. पालखी मार्ग व पंढरपूर, वाखरी व ६५ एकर येथे पुरेशी शौचालये उपलब्ध करण्यात आली आहे. आषाढी वारी सोहळ्यात चंद्रभागा नदीत पुरेसे पाणी राहील याची दक्षता घेण्यात आली असून जलसंपदा विभागामार्फत पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पालखी मुक्काम, विसावा, ६५ एकर, वाळवंट येथे विद्युत वितरण कंपनीमार्फत तात्पुरती वीज कनेक्शन देण्याचे नियोजन झाले आहे. वारकऱ्यांना केरोसीन व गॅस मिळावा याचे नियोजन केले असल्याचेही श्री.भोसले यांनी सांगितले.

बैठकीत मानाचे पालखी विश्वस्त व पंढरपुरातील नागरिकांनी विविध सूचना केल्या. या सूचनांवार आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असेही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी सांगितले.

प्रांतधिकारी सचिन ढोले यांनी प्रास्ताविक करुन सादरीकरणाव्दारे तयारीची माहिती दिली. अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी आभार मानले.

जिल्हाधिकारी म्हणाले……

पालखी मार्गावर प्रत्येक २ कि.मीवर वैद्यकीय पथक
पुरेसा पोलीस बंदोबस्त.
नदीपात्रातील खड्डे बुजवणार
पालखी मार्गावरील विद्युत वितरण कंपनीकडील ट्रॉन्स्फॉर्मरना कुंपण
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत सुमारे 3500 बसचे नियोजन
६५ एकर येथे मोबाईल टॉवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button