त्या बाणेदार वचनाचे काय झाले? आशिष शेलार यांचा शिवसेनेला सवाल
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीला काही महिने शिल्लक आहेत. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्ष जुन्या आश्वासनांचा हिशेब मागत आहेत. भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी ‘मुंबईत ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफी’ याची आठवण करून देत शिवसेनेला – ‘जे बाणेदार वचन दिले, त्याचे काय झाले?’ असा सवाल केला आहे. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेने मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या सदनिकांचा मालमत्ता कर पूर्ण माफ करण्याचे आश्वासन दिले होते.
त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, मुंबईत ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना संपूर्ण मालमत्ता करमाफीचा शिवसेनेचा निर्णय हवेतच विरला का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी यावरून शिवसेनेला सवाल केला आहे. “सुटलेला बाण आणि दिलेल्या वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात. मग, मुंबईकरांना ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे ‘बाणेदार वचन’ दिले त्याचे काय झाले? टाटा, जावई, मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या ! ” असा टोमणा शेलारांनी मारला.
मागील वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संपूर्ण मालमत्ता करमाफी दिल्यानंतर यंदा मात्र महापालिका प्रशासनाने यू टर्न घेतल्याचे वृत्त समोर आले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वसूल न केलेल्या २८५ कोटींच्या मालमत्ता कराची थकबाकी आता वसूल करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती आहे. यंदा मालमत्ता कर अंतर्गत येणाऱ्या १० करांपैकी केवळ सर्वसाधारण कर माफ केला जाणार असून, इतर ९ कर मात्र भरावे लागणार अशी माहिती आहे. त्यावरूनच आशिष शेलार यांनी शिवसेनेला सवाल केला आहे.
सुटलेला बाण आणि दिलेला वचनाचा शब्द परत घेता येत नाही, असे म्हणतात.
मग, मुंबईकरांना 500 चौरस फुटा पर्यंतच्या घरांना मालमत्ता करात सूट देण्याचे जे "बाणेदार वचन" दिले त्याचे काय झाले?
टाटा,जावई,मुलाला वाटून झाले असतील तर आता आमच्या सामान्य मुंबईकरांची आठवण येऊ द्या!— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 5, 2021
