Maharashtra Govमुंबई

माजी न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

विद्वान, व्यासंगी व्यक्तिमत्त्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई दिनांक २९: मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.एन देशमुख यांच्या निधनाने राज्य एका व्यासंगी विधीतज्ज्ञाला मुकले आहेच परंतू श्रमिकांच्या न्याय्य हक्कासाठी आपल्या वकिली पेशाच्या माध्यमातून लढणारे एक कणखर व्यक्तिमत्त्वही काळाच्या पडद्याआड गेले आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणतात की, सामाजिक प्रश्नांवर ऐतिहासिक निर्णय देणारे न्यायमूर्ती म्हणून श्री. देशमुख यांना अवघा महाराष्ट्र आणि देश ओळखतो. त्यांनी सर्वोच्च न्यायालयातही वकिली केली. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ उभारण्यात श्री. देशमुख यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. सुरुवातीपासून वकिली करताना त्यांनी समाजातील उपेक्षितांचा, कष्टकऱ्यांचा आवाज म्हणूनच काम करणे पसंत केले. ऊस पिकवणारा शेतकरी असो किंवा कोणताही कष्टकरी त्यांच्या न्याय्य हक्काची जपणूक करण्याला त्यांनी प्राधान्य दिले त्याअनुषंगिक निर्णय घेतले.

त्यांच्या निधनाने विधीक्षेत्राची जशी हानी झाली आहे तसेच सामाजिक क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले होते असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात वकिली करत असताना बी. एन. देशमुख यांना राज्य विधान परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. विधान परिषदेत सहा वर्षे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधित्व केले होते. या काळात राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उठवला होता. सभागृहातील त्यांच्या योगदानाची कायमच नोंद घेतली जाईल. त्यानंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली. शेतकरी, कष्टकरी, कामगार तसंच सामाजिक प्रश्रावर त्यांनी उच्च न्यायालयात दिलेले अनेक निर्णय ‘ऐतिहासिक’ ठरले. औरंगाबाद येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिले. १९९७ मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदावरुन ते निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली  केली. त्यांच्या निधनाने अभ्यासू मार्गदर्शक  हरपला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button