‘गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका आहे का?’ पाटबंधारे विभागाला शासनाचा सवाल
नाशिकमधील मातीचे धरण असलेल्या गंगापूर धरणाला खेकड्यांचा धोका आहे का ? असा प्रश्न पाटबंधारे विभागाला शासनाने विचारला आहे. चिपळूणमधील तिवरे धरण हे निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे नव्हे तर खेकड्यांमुळे फुटले, असा अजब दावा राज्याचे जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केला. यावर अनेक मेम्स व्हायरल झाले. विरोधकांनी ‘आरोपी खेकड्यांना’ पोलिसांच्या हवाली केले. यावरूनच आता पाटबंधारे विभागाला शासनाने असा सवाल विचारला आहे.
तिवरे धरण फुटून 20 जणांचा मृत्यू झाला व अनेक घरे उद्धवस्त झाली. या धक्क्यातून जिल्हा अद्याप सावरलेला नाही. तर राज्यातील अनेक धरण्यांच्या गळती समोर येत आहेत. धरणा शेजारी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय. गंगापूर धरणा संदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. खेकडा दगड कोरु शकतो तर माती का नाही ? यासाठी आता सर्व्हेक्षण केले जात आहे. तिवरे धरणही मातीचे होते. या धरणफुटीच्या पार्शवभूमीवर शासनातर्फे राज्यभरात धरणाचा आढावा घेतला जात आहे.