मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा आणि वैतरणा या धरणांमधील पाण्याची पातळी जवळपास पूर्ण क्षमतेने भरली आहे. लवकरच ही धरणे पूर्ण भरून वाहण्याची शक्यता असल्याने वैतरणा नदी क्षेत्रात येणाऱ्या ठाणे आणि पालघर क्षेत्रातील गावांना मुंबई महानगरपालिकेने सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भात पालिकेने ठाणे, पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि भिवंडी, शहापूर, वाड्याचे तहसीलदार तसेज आपत्कालीन व्यवस्थापन कक्षा पत्र पाठवले आहे.
वैतरणा आणि तानसा धरणाखालील आणि नदीच्या आजुबाजूच्या परिसरातील रहिवाशांना पुराची कल्पना देऊन सावध राहण्याचे निर्देश द्यावेत, असे पत्र पालिकेने संबंधित यंत्रणांना दिले आहेत. वैतरणा नदी पात्राच्या आजुबाजुच्या ४२ गावांची यादी पालिकेने दिली आहे. यात वाडा, पालघरमधील गावांचा समावेश आहे. तसेच तानसा नदी पात्राच्या आजुबाजुच्या ३३ गावांच्या नावांची यादी देण्यात आली आहे. ही गावे शहापूर, भिवंडी, वाडा आणि वसई तालुक्यातील आहेत. मोठा पाऊस पडल्यास धरण वाहू लागले आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढली तर या गावांना पुराच्या पाण्याचा धोका असल्याचा इशाराही पालिकेने पत्राद्वारे दिला आहे.



