केंद्रीय समितीने वरळी पॅटर्नचा उल्लेख केलाच नाही, सरकारने आकड्यांची बनवाबनवी थांबवावी – फडणवीस
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाताना पाहून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. राजकारण न करता, कोरोनातून बरे होणा-या रुग्णांचे आकडे फुगवून सांगणे वगैरे सरकारने बंद करावे व कोरोनातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी कठोर प्रयत्न करावे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
त्याचप्रमाणे फडणवीस यांनी वरळी पॅटर्नवरही कडाडून टीका केली आहे. वरळी पॅटर्नचा उल्लेख, केंद्राच्या समीतीने केलाच नाही असे फडणवीस म्हणालेत. माध्यमांतील बातम्याव्यतिरिक्त वरळी पॅटर्न कुठेच दिसला नसल्याचेही फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आयसीएमआरने आणि केंद्रीय समितीने जे सांगितलं होतं ते लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते कोठेही वरळी पॅटर्न म्हटलेच नाहीत. मात्र, वरळी पॅटर्न देशभरात स्वीकारणार अशा बातम्या प्रकाशित करण्यात आल्या. खरंतर वरळी पॅटर्नमध्ये लक्षणं नसलेल्या संशयितांच्या चाचणी पूर्णपणे बंद करुन टाकण्यात आल्या होत्या. वरळीच्या खासगी प्रयोगशाळेत चाचण्या सुरु होत्या. त्या प्रयोगशाळा बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे एकुणच लपवाछपवी करुन आपल्याला कोरोनाचा संसर्ग थांबवता येणार नाही.” असे फडणवीस यांनी सरकारला सुनावले आहे.