मराठवाड्यात नव्या साखर कारखान्यांना परवानगी नाही
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत मराठवाड्यात नव्या साखर कारखान्यांना परवानगी द्यायची नाही, असा निर्णय घेण्यात आला. तसचे ऊसाच्या पिकाला १०० टक्के पाणी हे ठिबक सिंचनाद्वारे द्यावे, असाही नियम सरकारकडून करण्यात येणार आहे. मराठवाड्यातील दुष्काळस्थिती पाहता साखरेचे पीक घेण्यावर बंदी घालावी, अशी मागणी काही मंत्र्यांनी केली होती. मात्र, ऊसाच्या पिकावर बंदी घालणे शक्य नसल्याने नव्या साखर कारखान्यांना मराठवाड्यात परवानगी द्यायची नाही, असा निर्णय मंत्रिमंडळाच्या या बैठकीत घेण्यात आला आहे.
ऊसाच्या लागवडीसाठी सगळ्यात जास्त पाणी लागत असल्याने शेतकरी भूगर्भातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे यापुढे ऊसाच्या पिकासाठी शंभर टक्के ठिबक सिंचन योजना राबवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. यासाठी ठिंबक सिंचनाला ८० टक्के अनुदान देण्याचा निर्णयही घेण्यात आला.