रविवारी मध्यरात्रीपासून सुरु असणाऱ्या संततधार पावसामुळे डहाणू, वाडा आणि तलासरी तालुक्यातील नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. डहाणू तालुक्यातील कोचाई येथील नदीला आलेल्या पुरामुळे पारसपाडा पूल पाण्याखाली गेल्याने शेजारच्या चार गावांचा संपर्क तुटला असून वाडा तालुक्यातील सोमवारी दिवसभर झालेल्या मुसळधार पावसाने देहेरजा नदीला पूर आला.
कोचाई पाटीलपाडा येथे ठेकेदाराने पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या नवीन पुलाचे काम अर्धवट सोडून दिल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अर्धवट सोडून दिलेल्या कामामुळे शाळा महाविद्यालयात जाणारी मुले, औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार तसेच शेतकरी आणि रुग्ण यांना तालुक्याच्या ठिकाणी जाणे अवघड झाले आहे. तर नागरिकांना ये-जा करताना हाल सहन करावे लागत आहेत.