राजीनाम्या नंतर संजय राठोड यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडकलेले संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. विरोधी पक्षाने घाणेरडं राजकारण करुन माझी आणि माझ्या समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मला राजकीय जीवनातून उठवण्याचा कट रचण्यात आला आहे. म्हणून या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि या प्रकरणातून सत्य बाहेर यावे, यासाठी मी माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला असल्याचे राठोड म्हणाले.
मी ज्या मतदारसंघाचे नेतृत्व करतो त्यातील बंजारा समाजाच्या एका मुलीने आत्महत्या केली. त्याचा संबंध माझ्याशी जोडून मला गुन्हेगार ठरवले. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत विरोधी पक्षाला उसंत नव्हती, त्यामुळे मी बाजुला होत आहे, असे स्पष्टीकरण वनमंत्री संजय राठोड यांनी दिले.
‘गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांनी मला राजकीय जीवनातून उठविण्याचा घाणेरडा प्रयत्न केला. गेल्या ३० वर्षांपासून मी राजकीय जीवनात आहे. आज मला उद्ध्वस्थ केलं आहे. या प्रकरणाचा तपास होऊन जर मी दोषी निघालो असतो तर मी राजीनामा दिला असता. पण मला वेळ दिला नाही. त्यामुळे मी बाजुला होऊन या प्रकरणाचा निष्पक्ष तपास व्हावा अशी माझी अपेक्षा आहे. या प्रकरणाचा माझ्या व्यक्तिगत आणि राजकीय जीवनावर परिणाम झाला आहे. माझ्या समाजावरही परिणाम झाला आहे. आम्ही अधिवेशनच चालू देणार नाही, ही विरोधी पक्षाची भूमिका लोकशाहीविरोधी आहे. त्यामुळे सत्य बाहेर यायचे असेल तर चौकशी होऊ द्यावी लागेल.’ असे संजय राठोडांनी स्पष्ट केले. यावेळी राठोड यांच्यासोबत संसदीय कार्यमंत्री अनिल परब, शिवसेनेचे नेते अनिल देसाई उपस्थित होते.