नाशिक: हाथरस मधील घटनेने सगळेच जण हादरले आहेत. १९ वर्षीय मुलीचा सामूहिक बलात्कार निर्भया प्रकरणावर झोत देते. दरम्यान, योगी सरकार आणि मोदी सरकार यांच्यावर जोरदार टीका संपूर्ण देशातून केली जात आहे. निर्भया प्रकरणानंतर दिल्लीचं तख्त बदललं होतं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे विसरू नये, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते, अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. हाथरसची घटना मन विषण्ण करणारी आहे, असं भुजबळ म्हणाले.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी दिलेली वागणूक निषेधार्ह असल्याचं देखील भुजबळ म्हणाले. राहुल गांधी यांना झालेल्या धक्काबुक्कीनंतर देशात लोकशाही आहे की नाही असा प्रश्न पडला आहे, अशी उद्विग्न प्रतिक्रिया त्यांनी दिली.
महात्मा गांधी यांची जयंती आणि गांधी जयंतीच्या पूर्वसंध्येला राहुल गांधींना धक्काबुक्की तसंच त्यांच्यावर लाठीचार्ज होणं हे निंदनीय आहे. देशाच्या संसदेतील एका वरिष्ठ नेत्याला अशा प्रकारची वागणूक दिली जात आहे, तिथे सर्वसामान्य नागरिकांची काय हालत असेल, असं भुजबळ म्हणाले आहेत.
