कोकणाचे वैभव पुन्हा आणू – प्रवीण दरेकर
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळाने कोकणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत करून टाकले आहे. घरे उद्ध्वस्त झाली आहेत. बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत, मच्छीमार उद्ध्वस्त झाले आहेत. आता पुन्हा कोकणला उभे करायचे आहे. कोकणाच्या दौऱ्यात कोकणाचे जे विदारक चित्र पाहिले, ते बदलायचे आहे. कोकणवासियांना तात्कालिक मदत करायची आहे, तसेच शासनाने घोषित केलेली मदतही त्यांना मिळवून द्यायची आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून आपण सारे मिळून कोकणाला पूर्वस्थितीत आणू, कोकणाला वैभवाचे दिवस पुन्हा आणू, असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. दरेकर यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. वादळामुळे कोकणाला मोठा फटका बसला असून बागा संपूर्णतः उद्धवस्त झाल्या आहेत. बागायतदारांना मदत करण्यासाठी मुंबईतील तरुणांच्या समूहाने आणि सेवाभावी समूहाने मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन प्रवीण दरेकर यांनी केले.