पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात २७ जणांचा मृत्यू
पुणेः पाच जिल्ह्यांतील पुरात २७ जणांचा मृत्यू
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या पाच जिल्ह्यांमध्ये आलेल्या पुरात आतापर्यंत २७ जण मृत्युमुखी पडले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. कोल्हापूरमधील पाणी पातळी कमी होत असली, तरी सांगलीत पाणी पातळी वाढली आहे, असे म्हैसेकर यांनी सांगितले.
सांगलीमध्ये सध्या सुमारे ३० ते ३५ हजार नागरिक पुरात अडकले असण्याची शक्यता आहे. तर, कोल्हापूरमध्ये १७ ते १८ हजार नागरिक पुरात सापडले आहेत.पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २ लाख ५ हजार ५९१ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. यामध्ये सांगली आणि कोल्हापूरमधील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.
कोल्हापूर आणि सांगली येथे पुरामध्ये अडकलेल्या व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यासाठी मुंबईहून दोन हेलिकॉप्टर मागवण्यात आले आहेत. सध्या एक हेलिकॉप्टर कार्यरत आहे, स्थलांतरित करण्यात आलेल्यांना हेलिकॉप्टरद्वारे अन्नपदार्थ पुरवण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे, अशी माहिती म्हैसेकर यांनी दिली.

