आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३१ मार्चपर्यंत बंदच राहणार!
नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेन दिवस वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमासेवा ३१ मार्च २०२१ पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर महिन्यात ही सेवा ३० नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा ही सेवा सुरु करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे.
डीसीजीएने जारी केलेल्या परिपत्रकात याबाबत आदेश दिले आहेत. इंटरनॅशनल कार्गो संचालन आणि डीजीसीएद्वारे परवानगी दिलेल्या विमानसेवेवर हे लागू होणार नाही. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय विमानसेवेतील अधिकाऱ्यांना काही मार्गांसाठी परवानगी देण्याची अनुमती देण्यात आली आहे, असे डीसीजीएने सांगितले.
आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीसाठी भारताने काही देशांशी हवाई करार केले आहेत. त्याला एअर ब्रीज किंवा एअर बबल असं म्हटलं जातं. केनिया, भूतान, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, युएई, कतार, नायजेरिया, मालदीव, जपान, इराक, जर्मनी इत्यादी अनेक देशांसह भारताने एअर बबल करार केले आहेत. दोन देशांमधील एअर बबल करारानुसार विशेष आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणे प्रतिबंधात्मक परिस्थितीत त्यांच्या एअरलाइन्सद्वारे एकमेकांच्या प्रदेशात ऑपरेट करता येऊ शकते.
एअर बबल करारानुसार एका विशिष्ट आंतरराष्ट्रीय परिस्थितीत सर्वच देशांना जगातल्या सर्व देशांबरोबर आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक करता येत नाही, त्यावेळी व्यापारी किंवा मैत्रीपूर्ण संबंध असलेले दोन देश एकत्र येऊन द्वीपक्षीय करार करतात, त्यानुसार करार करणाऱ्या दोन देशांमध्ये ठरलेल्या तरतुदीनुसार हवाई वाहतूक करता येते. परंतु या दोन देशांदरम्यान विमान वाहतूक करताना, ज्या ज्या देशांच्या हवाई हद्दी वापरायच्या असतात, त्यांचीही सहमती घ्यावी लागते.
कोरोनामुळे देशात २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय विमान सेवेवर बंधनं आणली आहेत . १६ जुलै रोजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली होती. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याकडं मात्र लक्ष लागून आहे.
