कोल्हापूर : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी मतदान आज सकाळपासून सुरू झाले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. राज्यातल्या विधानपरिषदेच्या सर्वच जागांवर भाजपचा विजय होईल, असा विश्वाससुद्धा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी येथील महाराष्ट्र हायस्कूल मधील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला, त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यातील ३ पदवीधर आणि २ शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी मतदान पार पडत आहे. अनेक नेत्यांनीही आपला मतदानाचा हक्क आज बजावला आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी या ६ जागाही आम्हीच जिंकणार असा दावा केला आहे. या जागांवर चुरस आहे पण विजयाची खात्री असल्याचा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे. इतकच नाही तर पुण्याची जागा तर वनवे असल्याचंही पाटील म्हणाले आहेत.
पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या मतदानासाठी चंद्रकांत पाटील कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. ‘पुणे पदवीधर मतदारसंघात आपण दोन वेळा आमदार झालो आहोत. तेव्हा उमेदवार स्ट्रॉंग होते. आता तर उमेदवार विक आहे. अरुण लाड यांना घरचा रस्ता दाखवण्याचाच हा मार्ग आहे’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.
पदवीधरचा आमदार असताना आपण केलेल्या कामाची यादी मोठी असल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. विरोधकांना मुद्दाच नाही. झोपलेल्याला उठवता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्याला उठवता येत नसल्याची टीका पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर केली आहे. पुणे पदवीधर हा ३६ वर्षे आमचा गड राहिला आहे. आताही तो कामय राहिल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे पाटलांचा विश्वास कायम राहणार का हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
जोपर्यंत नाथाभाऊ पक्षामध्ये होते तेव्हा आम्ही ते पार्टीमध्ये राहावे यासाठी अथक प्रयत्न केले होते. मात्र खडसे यांच्या बद्दल मी बोलणे बंद केले आहे. त्यामुळे आता नाथा भाऊंनी राष्ट्रवादीमध्ये सुखात राहावे, असा सल्ला देत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘रात गई, बात गई’ असेही म्हटले.
पाटील म्हणाले, जगात चंद्रकांत पाटील कोणावरही बोलले तर ज्यांच्यावर बोललो ते कोणीही बोलत नाहीत. मात्र ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ लगेचच त्याचे प्रत्युत्तर देतात. याचे नेमके गौडबंगाल काय आहे हे समजले नाही, जर मी मुख्यमंत्र्यांच्यावर बोललो असेल तर मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर द्यायची काय गरज? असा सवाल सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
