मुंबई

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

माँसाहेबांचा राज्यकारभार माझ्यासह सर्व राज्यकर्त्यांना प्रेरणादायी, मार्गदर्शक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : लोकमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले.

मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात, प्रजेच्या सुखासाठी अहिल्यादेवींनी दानधर्माच्या माध्यमातून अनेक चांगली कामे केली. जी आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देत उभी आहेत. त्यांनी प्रजाहितदक्षतेचा प्रेरणादायी वारसा आपल्याला दिला आहे. अशा शौर्य, धैर्य, न्यायाच्या मुर्तीरूप अहिल्यादेवींना कोटी कोटी प्रणाम.

राष्ट्रनिर्मात्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माँसाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास, स्मृतीस मी वंदन करतो. विनम्र अभिवादन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँसाहेबांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत असताना त्यांनी त्याकाळात भारतभर केलेल्या विकास कामांचा डोंगर नजरेसमोर उभा राहतो. प्रजाहितदक्ष राज्यकर्ता कसा असावा, हे त्यांनी कार्यातून दाखवून दिलं. स्वत:च्या संस्थानाबाहेरही लोकहिताची कामे केली. देशात ठिकठिकाणी रस्ते, देवळं, विहिरी, तलाव, नदीघाट, धर्मशाळेसारख्या असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या, त्या आजही तितक्याच भक्कमपणे उभ्या आहेत. अहिल्यादेवींनी दूरदष्टीनं निर्माण केलेल्या या सोयीसुविधांनी देशवासियांच्या मनात राष्ट्रनिर्मितीची भावना रुजवण्याचं मोलाचं काम केलं, असे श्री.पवार यांनी म्हटले आहे.

श्री.पवार म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महान योद्धा होत्या. कुशल प्रशासक,  न्यायप्रिय,  प्रजाहितदक्ष, दानशूर राज्यकर्त्या होत्या. मुलकी आणि लष्करी प्रशासन वेगळे करुन कुशल राज्यकारभाराची चुणुक त्यांनी दाखवली होती. महिलांच्या सक्षमीकरणाचं काम त्यांनी त्याकाळात केलं. महिलांना शिक्षण, प्रशिक्षण, अधिकार दिले. शेतकऱ्यांवरील, व्यापाऱ्यांवरील अन्याय दूर करुन त्यांना प्रोत्साहन दिलं. लोककला, कलावंतांना आश्रय दिला. उद्योगांना प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलं. अहिल्यादेवी महान राज्यकर्त्या होत्या, तितक्याच थोर विचारवंत होता, त्यांचे विचार सुधारणावादी, अंधश्रद्धेवर प्रहार करणारे होते. त्यांच्या विचारांचं, राज्यकारभाराचं कौतुक जगभरात होत आलं आहे. यातूनच त्यांचं निर्विवाद श्रेष्ठत्व सिद्ध होतं.

अहिल्यादेवींच्या शौर्य, पराक्रम, आदर्श राज्यकारभारामुळे मराठा साम्राज्याची किर्ती देशातच नव्हे तर जगभरात पोहोचली, याचंही स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी माँसाहेबांनी त्याकाळात घेतलेला प्रत्येक निर्णय व केलेलं प्रत्येक कार्य हे माझ्यासह, प्रत्येक राज्यकर्त्याला प्रेरणा, मार्गदर्शन देत राहील. मी त्यांच्या महान कार्याला, पवित्र स्मृतींना वंदन करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button