FeaturedFoodHealth & FitnessMaharashtra Govआरोग्य

आरोग्य विभागामार्फत ४७ हजार स्थलांतरित मजुरांचे मानसिक समुपदेशन

मुंबई : कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील अनेक मजूर राज्यातील काही भागात अडकले आहेत. सुमारे ९४४ निवारागृहांमध्ये हे मजूर राहत असून त्यांना प्रशासनामार्फत विविध सोयीसुविधा पुरविल्या जात आहेत. याच जोडीला त्यांना जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे मानसिक समुपदेशन करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत सुरू आहे. आतापर्यंत राज्यातील ४७ हजार स्थलांतरित मजुरांना या सेवेचा लाभ मिळाला आहे. त्याचबरोबर ज्यांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे त्यांचेही समुपदेशन केले जात आहे.

कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर राज्यातील आणि राज्याबाहेरील असंघटीत क्षेत्रातील मजूर अडकले आहेत. या स्थलांतरित मजुरांची राहण्याची आणि जेवणाची सोय विविध जिल्ह्यांमध्ये करण्यात आली. घरापासून दूर राहणे, आर्थिक कुचंबणा, कोरोना आजाराची सुप्त भीती यामुळे या मजुरांना अनेक मानसिक व्याधींना तोंड द्यावे लागते. यासाठी जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाद्वारे या स्थलांतरित मजुरांना समुपदेशन देण्यात येत आहे.

मजुरांमध्ये समुपदेशनाचा विधायक परिणाम – आरोग्यमंत्री राजेश टोपे

कोरोनाची सोप्या भाषेत माहिती, घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करु नये याबाबत या मजुरांना माहिती देण्यात येत आहे. समुपदेशक, मनोविकार तज्ज्ञ आणि मनोविकार परिचारिका यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या समुपदेशनाचा विधायक परिणाम मजूर वर्गामध्ये दिसत आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

समुपदेशना दरम्यान, ज्या मजूरांना मध्यम ते गंभीर स्वरुपाचे मनोविकार आहेत त्यांना भरती करुन योग्य ते उपचार देण्यात येत आहेत. सध्या सुमारे आठ हजाराच्या आसपास लोकांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. तिथे जाऊन त्यांचे समुपदेशन करुन, त्यांच्या अडचणी समजवून घेण्याचे काम केले जात आहे.

राज्यात सध्या ३० समुपदेशक, २८ मनोविकार तज्ज्ञ, ३६ मनोविकार नर्स यांच्या माध्यमातून हे काम केले जात आहे. प्रत्येक जिल्ह्यात साधारणत: दोन ते तीन पथक आहेत. जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून यापथकाद्वारे प्रेरणा प्रकल्पांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त भागात समुपदेशनाचे काम केले जाते. गेल्या वर्षी कोल्हापूर, सांगली येथे आलेल्या पुरानंतर तेथील पूरग्रस्तांनाही समुपदेशनाचं काम या पथकामार्फत करण्यात आले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button