राज्यात दुसऱ्या लॉकडाऊन ची शक्यता !
वेळ पडल्यास कठोर निर्णय घ्यावे लागतील- अजित पवार
मुंबई: राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव हा पुन्हा वाढत आहे. काहीच दिवसांपूर्वी मुंबईमध्ये तसेच अमरावती मध्ये कोरोनाचा उद्रेक झाला होता. डिसेंबरनंतर दुसऱ्यांदा काल एकाच दिवसांत चार हजारापेक्षा अधिक नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले. जर हे चित्र असच राहिल तर कठोर पाऊले उचलावी लागतील असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली. वेळ पडल्यास कठोर होऊ त्यामुळे नागरिकांनी आपली मानसिकता तयार ठेवा असाही ते म्हणाले.
“जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर त्यांना लॉकडाउन करावं लागलं. आपल्यातील अनेकांना याबाबत गंभीरताच राहिलेली नाही, हे खरोखरच खूप काळजीचं आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्र्यांची सर्वांसोबत चर्चा होणार आहे. त्यानंतर काही कठोर निर्णय कदाचित घ्यावे लागतील. त्याबद्दलची मानसिकता नागरिकांनी तयार ठेवावी.” असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी राज्यातील जनतेला दिला आहे.
“काही गोष्टींमध्ये आपण वेळीच निर्णय़ नाही घेतले, तर अडचणींना सामोरं जावं लागतं. ग्रामस्थ, नागरीक मास्क वापरण्याचा अजिबातच विचार करत नाहीत हे अतिशय घातक आहे. आपल्याला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल अशी परिस्थिती आहे, गंभीरतेने घ्यायला हवं.” असं देखील त्यांनी या पत्रकार परिषदेत बोलून दाखवले.