Maharashtra GovPoliticsShivSena-Congress-NCPमुंबईराजकारण

…तर पवारांचं भाकीत खरं ठरणार, राष्ट्रवादी बनू शकते राष्ट्रीय स्तरावर प्रमुख विरोधीपक्ष

मुंबई: पक्षाध्यक्षाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षामध्ये मोठा कलह निर्माण झाला आहे. काँग्रेसच्या अंतर्गत धुसफुसीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय राजकारणातील विरोधी पक्षांतील महत्त्वाचा दुवा असून तो दुर्बळ होऊ नये म्हणून त्या पक्षातील स्थितीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवण्याची जबाबदारी पवार यांनी आपले विश्वासू सहकारी व खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर सोपविली आहे. काँग्रेसमधील घडामोडींची खडान्खडा माहिती त्वरित द्यावी, असेही पवार यांनी पटेल यांना सांगितले आहे.

१९९९ साली काँग्रेस पक्षात जशी फूट पडली होती, तशीच स्थिती पुन्हा निर्माण झाल्यास ती नामी संधी असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. आता काही काँग्रेस नेते रोज खासदार प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधून चर्चा करीत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्यास सक्षम नाहीत असे मत शरद पवार आधीपासून व्यक्त करत आले आहेत. काँग्रेसमध्ये तशा घडामोडी घडल्या तर पवारांचे मत खरे ठरेल. राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रवादी एक प्रमुख विरोधीपक्ष म्हणून उदयास येऊ शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. काँग्रेसच्या अंतर्गत घडामोडींबाबत प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना इत्थंभूत माहिती दिली आहे, असे कळते.

काँग्रेस पक्ष आणखी दुबळा झाला तर त्याचा परिणाम देशातील ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत, त्यांच्यावर होण्याची शक्यता आहे. तो धोका वेळीच ओळखून शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याकडे खास जबाबदारी दिली आहे. त्यामुळेच पटेल हे मंगळवारी तातडीने मुंबईहून दिल्लीत परतले व आता दिल्लीतच मुक्कामी आहेत.

दरम्यान, काँग्रेसच्या काही नेत्यांशी बोलणे झाले आहे का, असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता, पटेल त्यांनी स्मितहास्य करून उत्तर दिले. ते म्हणाले की, आम्ही दररोज परस्परांशी संवाद साधत असतो. काँग्रेस ही अधिक मजबूत व्हावी अशी आमची इच्छा आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रामध्ये केलेला आघाडी सरकारचा प्रयोग राष्ट्रीय स्तरावरही करणे शक्य होईल. काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींबद्दल कोणतेही भाष्य करण्यास प्रफुल्ल पटेल यांनी नकार दिला. वित्तविषयक संसदीय स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आलो होतो, असेही प्रफुल्ल पटेल यांनी न चुकता स्पष्ट केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button