ठाणे (प्रतिनिधी) – या सरकारच्या विरोधात जो की आवाज उठवत आहे. त्यांचा आवाज ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दाबण्यात येत आहे. हे देश आणि राज्यासाठी घातक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केल्या.
पूरग्रस्तांचे संसार वाहून गेल्यामुळे त्यांचा संसार उभे करण्याचे मोठे आव्हान होते. हे ध्यानात आल्यामुळे आ. आव्हाड यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्तांचे संसार उभे करण्यासाठी त्यांना आवश्यक असणार्या गृहपयोगी वस्तू आज सांगली-कोल्हापूरला रवाना केल्या. या साहित्याच्या ट्रक्सना हिरवा झेंडा दाखवण्यासाठी सुप्रिया सुळे ठाण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, दुर्देवं आहे की जी व्यक्ती या सरकारच्या विरोधात बोलते त्या व्यक्तीला सातत्याने ईडी, सीबीआय यांची भीती दाखवून त्यांचा आवाज दाबण्याचे काम केले जात आहे. मनी आणि मसल पॉवरचा वापर करुन आवाज उठवणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सरकार करीत आहे. या देशात अशा गोष्टी कधीच झाल्या नव्हत्या. त्या प्रथमच पहायला मिळत आहेत. आपल्या व्यवस्थेसाठी हे धक्कादायक आहे. कोणताही खटला असो अगर एखादे जुने प्रकरण निवडणुका पुढे असल्यानेच सरकार चौकशांचा फार्स पुढे करीत आहे. अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे. सामान्य जनतेची सेवा ते कधीच करीत नाहीत. निवडणुकीचा प्रचार करण्यातच ते आपला वेळ घालवत आहेत. सांगली-कोल्हापूर पूरामध्ये ते दिसून आलेच आहे. पूरस्थितीमध्ये त्यांचे मंत्री सेल्फी काढताना किंवा प्रचार करताना दिसले. मुख्यमंत्र्यांनाही पूरग्रस्तांची भेट घ्यायला चार ते पाच दिवस लागले होते. आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी हे सरकार घातक आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांची पाठराखण केली आहे. याबाबत विचारले असता, आनंद वाटतोय, महाराष्ट्रातील लोक अजूनही आपले कुटुंब आणि संवेदनशीलपणा टिकवून आहेत. ठाकरे कुटुंबावर चांगले संस्कार झालेले आहेत. त्यांच्यावर बाळासाहेबांचे संस्कार आहेत. त्यामुळे आश्चर्य वाटत नाही. तर आनंद वाटतो की उद्धव ठाकरे हे त्यांच्या कुटुंबासोबत आहेत, असे त्या म्हणाल्या.



