सचिन वाझे हिरेन यांच्या पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; शेलारांनी उपस्थित केली शंका
मुंबई: मनसुख हिरेन यांच्या मृत्यूवरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मुंब्रातील रेतीबंदर येथे हिरेन यांचा मृतदेह आढळून आला. संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं अनेक शंका उपस्थित केल्या जात असून, या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नावही घेतलं जात आहे. ठाणे पोलिसांचा किंवा एटीएसचा भाग नसलेले वाझे हिरेन यांच्या पॉर्टमार्टमच्या ठिकाणी काय करत होते, असा सवाल आता भाजपाकडून उपस्थित करण्यात आला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ही शंका उपस्थित केली आहे.
शेलार यांनी मनसुख हिरेन प्रकरणावरून सचिन वाझेंबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. सचिन वाझे हे ठाणे पोलिसांचा भाग नाहीत. ते एटीएसचाही भाग नाहीत. हिरेन मृत्यूप्रकरणात त्यांच्या भोवती संशयाची सूई फिरत आहे. असं असताना ते ठाण्यात पोस्टमार्टमच्या ठिकाणी हजर का आहेत? वाझे यांच्या या उपस्थितीमुळे संशय अधिकच बळावत आहे, असं शेलार म्हणाले. हिरेन मृत्यू प्रकरणात सरकारचा चौकशीचा फेरा आणि दिशा याबाबत संशय वाढत आहे. यात काही तरी काळंबेरं असल्याचं पुन्हा गडद होत आहे. त्यामुळेच या प्रकरणाची एनआयएकडे चौकशी देण्याच्या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला.
अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पियो गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवारी संशयास्पद अवस्थेत आढळून आला. हिरेन यांनी आत्महत्या केली असल्याचं म्हटलं जात असलं, तरी त्यांच्या मृत्यूबद्दल हिरेन यांच्या कुटुंबियांनी आणि विरोधी पक्षांनी शंका उपस्थित केल्या आहेत. महत्त्वाचं म्हणजे हिरेन यांच्या मृत्यूनंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं नाव घेतलं जात आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनीही सचिन वाझे यांचं नाव घेत काही सवाल उपस्थित केले आहेत.
“मला मनसुख हिरेन यांच्या मृत्यूबाबत काहीच माहिती नाही. पत्रकार आणि पोलीस त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते. त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो,” असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं. “मनसुख हिरेन यांनी पोलीस आणि पत्रकार त्रास देत असल्याचं म्हटलं होतं. पोलीस तुम्हाला संशयिताच्या नजरेने पाहत असल्याचं एका पत्रकाराने रात्री उशिरा फोन करून त्यांना म्हटलं होतं. तशी माहिती त्यांनी तक्रारीत दिलेली आहे,” असंही वाझे म्हणाले होते.
हमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत ठाणे पोलीस, मुंबई पोलीस हिरेन मृत्यूप्रकरणी योग्य काम करतील अशी भूमिका मांडली होती. मुंबई-ठाणे पोलिसांची शौर्यगाथा सांगणाऱ्या गृहमंत्र्यांना अवघ्या अर्ध्या तासातच हा तपास एटीएसकडे का द्यावा लागला? तपास कुणाकडे द्यावा हा राज्य सरकारचा अधिकार आहे. पण अर्ध्या तासात असे काय घडले की त्यामुळे गृहमंत्र्यांना आपल्या भूमिकेवरून फिरावं लागले . याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे , अशी मागणीही शेलार यांनी केली.