सरकार तीन पक्षांचे असल्याने एकमताने निर्णय घेणे महत्वाचे – बाळासाहेब थोरात
मुंबई : ऊर्जा खात्यामधील नियुक्त्यांवरुन महाविकास आघाडीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे . काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्यांचा फेरविचार केला जाईल असे सांगितले आहे. परस्पर केलेल्या नियुक्त्यांमुळे वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ही माहिती एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.
ऊर्जा खात्यात करण्यात आलेल्या नियुक्त्या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन एकमताने केल्या पाहिजेत. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. काही गोष्टी घडत असतात. काही विषय असतील तर आम्ही दुरुस्ती करत असतो. पण याला नाराजी म्हणणे योग्य नाही,” असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे.
निधी वाटप सर्व आमदारांना समान लेखून केले पाहिजे हे आमचे म्हणणे आहे. हे शिवसेना, राष्ट्रवादीच्याही आमदारांचे म्हणणे आहे. सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. सरकार चालवताना या गोष्टी होत असतात. चर्चा केली जाते, धोरणं ठरवली जातात. काही समस्या आल्या तर त्यातून मार्ग काढत असतो,” असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
दरम्यान सारथी काँग्रेसकडे राहिलं पाहिजे असा आमचा आग्रह आहे असेही म्हटले . तसेच मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवण्यात आले आहे अशी माहिती थोरात यांनी दिली.

